विधानसभा निवडणुकीचा आज निकाल; भाजपला सर्व जागा जिंकण्याचा विश्वास; काँग्रेसलाही पुनरागमनाची आशा

नागपूर जिल्ह्य़ातील विधानसभेच्या १२ जागांसाठी गुरुवारी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार असून सर्वच ठिकाणी असलेले बहुरंगी लढतीचे चित्र बघता मतदारांनी नेमका कोणाच्या बाजूने कौल दिला, हे आज स्पष्ट होणार आहे

२०१४ च्या निवडणुकीत भाजपने स्वतंत्रपणे लढून शहरातील सर्व म्हणजे सहा आणि ग्रामीणमधील सहापैकी पाच जागा जिंकून जिल्ह्य़ावर वर्चस्व स्थापन केले होते. काँग्रेसला केवळ एक जागा (सावनेर) मिळवता आली होती. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपची सेनेसोबत युती झाली. भाजपने नागपूरची तर सेनेने रामटेकची जागा जिंकली. यावेळी युतीला जिल्ह्य़ातील १२ पैकी उत्तर नागपूर वगळता ११ विधानसभा मतदारसंघात मंतांची मोठी आघाडी मिळाली होती. विधानसभा निवडणुकीतही ही हेच चित्र कायम राहावे म्हणून भाजपने जोरदार प्रयत्न केले तर  काँग्रेसनेही पुनरागमनासाठी कोणतीही कसर ठेवली नाही. २१ तारखेला ४७ टक्के मतदान झाले. त्याची मोजणी गुरुवारी सकाळी आठ वाजता सुरू होणार असून मतदाराचा कौल काय असेल हे हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

शहरातील सहा मतदारसंघात एकूण ८४ तर ग्रामीणमधील सहा मतदारसंघात ७२ असे एकूण १२ मतदारसंघात १४६ उमेदवार रिंगणात आहेत. प्रमुख उमेदवारांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (द.पश्चिम), बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे (उत्तर), काँग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी मंत्री नितीन राऊत (उत्तर), राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख (काटोल) व सावनेरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील केदार (सावनेर) यांचा समावेश आहे. बाराही मतदारसंघासाठी स्वतंत्रपणे मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी दुपारी द.पश्चिमच्या मतमोजणीस्थळी (मुंडले हायस्कूल) भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.

प्रमुख लढती

द.पश्चिम – देवेंद्र फडणवीस (भा.) विरुद्ध आशीष देशमुख (काँ.)

दक्षिण – मोहन मते (भा.), गिरीश पांडव (काँ.), किशोर कुमेरिया (सेना बंडखोर) ’ पूर्व- आ. कृष्णा खोपडे (भा.) वि. पुरुषोत्तम हजारे (काँ.)

मध्य – आ. विकास कुंभारे (भा.) वि. बंटी शेळके (काँ.) ’ पश्चिम – आ. सुधाकर देशमुख (भा.) वि. विकास ठाकरे (काँ.) ’ उत्तर – आ. मिलिंद माने (भा.) वि. नितीन राऊत (काँ.), सुरेश साखरे (बसपा) ’ काटोल – अनिल देशमुख (रा.) वि. चरण ठाकूर (भा.) ’ सावनेर – आ. सुनील केदार (काँ.) वि. राजीव पोतदार (भा.) ’ हिंगणा – आ. समीर मेघे (भा.) वि. विजय घोडमारे (रा.) ’ उमरेड – आ. सुधीर पारवे (भा.) वि. राजू पारवे (काँ.)

कामठी – सुरेश भोयर (काँ.) वि. टेकचंद सावरकर (भा.) ’ रामटेक – आ. मल्लिकार्जून रेड्डी (भा.) वि. आशीष जयस्वाल (सेना बंडखोर)

टपाली मतदानासाठी कर्मचाऱ्यांची धावाधाव

मतमोजणीला काही तास उरले असताना निवडणुकीच्या कामात असलेल्या कर्मचाऱ्यांची टपाल मतपत्रिका हातात पडल्याने ती वेळेत मतमोजणी केंद्रावर पोहचावी म्हणून धावाधाव सुरू झाली आहे. निवडणुकीच्या कामात १९  हजार कर्मचारी व्यस्त होते. बुधवारी रात्रीपर्यत ८ हजार टपाल मतपत्रिका पोहचल्या.

कर्तव्यावर असलेल्या काही कर्मचाऱ्यांना मंगळवारी सकाळी तर काहींना सायंकाळी टपाल मतपत्रिका मिळाली. त्यामुळे जे मतमोजणीच्या कामात नाही अशा कर्मचाऱ्यांनी कार्यालयातून संबंधित मतदार संघातील निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्या पोहचत्या केल्या. काही कर्मचाऱ्यांना गुरुवारी सकाळी टपाल मतपत्रिका आल्याचे कळताच मतपत्रिका मतमोजणी केंद्रावर पोहचवण्यासाठी त्यांची तारांबळ उडाली. जवळच्या टपाल पेटीत टाकल्यास ते गुरुवारी सकाळी ८ वाजता संबंधित मतमोजणी केंद्रावर मिळणे शक्य नसल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली. त्या ठिकाणी मतपत्रिका स्वीकारल्या जात आहेत.

  • झालेले मतदान (जिल्हा)
  • एकूण मतदार – ४१,७१,४२०
  • झालेले मतदान – २३,८५,७९९
  • टक्केवारी – ५७.१९ टक्के