चंद्रपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार खोटं बोलून राज्यातील बेरोजगार तरुणांची फसवणूक करीत आहेत. तरुणांची दिशाभूल करणारे हे पाप तुम्ही करू नका असा आक्रमक इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला.

राज्य सरकारच्या कंत्राटी नोकरी भरतीच्या धोरणावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली. राज्य सरकारने ९ खाजगी कंपन्यांना कंत्राट देऊन नोकर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. राज्य शासनाने तसा अध्यादेश काढला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ठोस भूमिका घेत बेरोजगार तरुणांची फसवणूक करू नका असे आवाहन केले आहे. हे नालायक सरकार राज्यातील तरुणाई उद्ध्वस्त करायला निघाले आहे. मुलांनो रस्त्यावर उतरा, आंदोलन करा, जोपर्यंत सरकार कंत्राटी नोकर भरतीचा अध्यादेश वापस घेत नाही तोपर्यंत मागे हटू नका, असं आवाहन वडेट्टीवार यांनी केलंय.

हेही वाचा – नागपूर : पंतप्रधानांच्य हस्ते भूमिपूजन, तरीही उड्डाण पुलाला ९ वर्षांचा विलंब, उद्या होणार वाहतुकीसाठी खुला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना स्वतःला मोठा नेता म्हणून घेत असाल तर अजितदादा हे पाप तुम्ही करू नका. उपमुख्यमंत्री अजित पवार खोटं बोलून तरुणांची फसवणूक करीत आहेत, असा आरोपदेखील वडेट्टीवार यांनी केला.

राज्याच्या काही विभागांमध्ये तातडीने पदभरती करणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने विविध विभागांमध्ये कंत्राटी स्वरुपात पदभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कंत्राटी पदभरतीचा निर्णय हा कायमस्वरूपी नसून, तो तात्पुरत्या स्वरुपाचा आहे, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यांच्या या स्पष्टीकरणावर विजय वडेट्टीवारांनी तीव्र आक्षेप नोंदवत अजित पवार यांना थेट इशारा दिला.

हेही वाचा – पृथ्वीपेक्षा चौपट मोठा ग्रह नेपच्यूनची १९ सप्‍टेंबरला प्रतियुती; अवकाशात नेमकं काय घडणारं, मानवी जीवनावर काय परिणाम होणार?

आज बेरोजगारांची संख्या राज्यात मोठी आहे. तेव्हा अशा पद्धतीने बेरोजगारांची फसवणूक होता कामा नये असेही वडेट्टीवार म्हणाले. कंत्राटी नोकर भरतीत गुणवत्ता यादीत असलेल्या मुलाला नोकरी मिळणार नाही, भाजपाचे निवडणूक प्रचाराचे काम करणाऱ्याला नोकरी मिळेल असेही थेट आरोप वडेट्टीवार यांनी केला. स्वतःला मोठा नेता म्हणाविणारे अजित पवार खोटं बोलून तरुणांची फसवणूक करीत आहेत. अजित पवारांवर माझा हा थेट आरोप आहे. दिशाभूल करणारे वक्तव्य करू नका. महाराष्ट्रातील तरुणांना फसवू नका. तुम्ही पक्ष फोडून गेलात, हा तुमच्या विषय आहे. आता तरुणांना उद्ध्वस्त करण्याचे पाप तरी करू नका, अशा शब्दात वडेट्टीवारांनी अजित पवार यांना सुनावलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६ सप्टेंबर २०२३ हा शासन अध्यादेश लागू झाला. हा निर्णय आधीच्या सरकारचा होता, असं हे सरकार सांगतंय. आमच्या वेळी हा निर्णय केवळ पंधरा प्रवर्गांसाठी होता. त्यामध्ये डाटा ऑपरेटर संगणक चालक यांचा समावेश होता. सरकारने त्यामध्ये बदल करून शिपाई ते इंजिनियर या सर्वच पदांचा समावेश केला. ५० हजार वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दहा हजार रुपये थेट या कंपनीकडे जातील. उद्या ही कंपनी २० हजार रुपये वेतनावर ठेवेल. त्यामुळे राज्यातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त होईल, असं वडेट्टीवार म्हणाले.