नागपूर : लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी मागील काही दिवसापासून सातत्याने निवडणूक आयोगावर मत चोरी झाल्याचा आरोप करीत आहेत. दोन दिवसाआधी पत्र परिषद घेऊन त्यांनी या संदर्भात मोठा गौप्यस्फोट केला. यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही यापूर्वी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपाची एक व्हिडिओ क्लिप सर्वत्र व्हायरल होत आहे. त्यात गडकरी यांनी निवडणूक आयोगावर आरोप केला आहे की, त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील तब्बल साडेतीन लाख मतदारांची नावे वगळण्यात आली होती. त्यात त्यांच्या नातेवाईकांचाही समावेश होता, असा आरोप त्यांनी केला.

यावरून आता विरोधक नितीन गडकरींना लक्ष करीत आहेत. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधीच्या डोक्यातली क्लिप खराब झाली असून डिस्क करप्ट झाल्याचा आरोप केला होता. यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नितीन गडकरींना लक्ष करत त्यांच्या डोक्यातील कोणती क्लिप खराब झाली, असा प्रश्न उपस्थित केला

राहुल गांधींच्या आरोपावर फडणवीस काय म्हणाले होते?

मतांची चोरी राज्यात किंवा देशात कोठेही झालेली नाही. मात्र लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या डोक्यातील चीप चोरीला गेली असून हार्डडिस्क करप्ट झाली आहे, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केली. त्यामुळेच राहुल गांधी हे त्याच गोष्टी रोज बोलत आहेत आणि खोटे बोलून पळून जात आहेत, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.

वडेट्टीवरांनी गडकरींवर काय आरोप केले?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटक विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदार घोटाळा झाल्याचे तपासात आढळून आल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कोणती चीप आणि डिस्क खराब झाली आहे ? निवडणुक आयोगाची वकिली करणारे मुख्यमंत्री, भाजप नेते गडकरींना जाब विचारणार का ? मतचोरी होते, मतदारयादीत घोळ केले जातात याचा पुरावा आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी गंभीर आरोप केला की त्यांच्या निवडणुकीत मतदारसंघातील ३,५०,००० नावं वगळण्यात आली. विशेष म्हणजे जी नावं वगळण्यात आली ते त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक होते. त्यांच्या भाच्याचे नावही वगळण्यात आले, अस गडकरी म्हणाले. नितीन गडकरी यांच्या जवळच्या लोकांची मत जर मतदारयादीतून गायब होत असतील तर इतरांचे काय ? कुठे मतदार वाढवून दाखवले जात आहे तर कुठे मतदार गायब केले जात आहे, मतचोरीचा याहून मोठा पुरावा काय आहे ? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवडणूक आयोग आता प्रतिज्ञापत्रक मागणार का ? अजून पुरावे मागणार की माफी मागणार ?