यवतमाळ: उमरखेड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा  नीला पूर येऊन नदी काठावरील शेतशिवारातील  पिके पाण्यात गेली. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या भागातील आमदार किसन वानखेडे हे रविवारी नुकसानीची पाहणी करण्यासाठी  मतखंड परिसरात गेले. मात्र या ठिकाणी त्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या भागातील प्रस्तावित सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध आहे, त्याचा सामना  आमदार वानखेडे यांना करावा लागला. परिसरातील सावळेश्वर, बोरी व माणकेश्वर यासह पैनगंगा नदीकाठच्या अनेक गावातील गावकऱ्यांनी आमदारांना सहस्रकुंड प्रकल्प नकोच, असे सांगत विरोध दर्शविला. 

 विधिमंडळ अधिवेशनात आमदार वानखेडे यांनी सहस्त्रकुंड प्रकल्पाला मान्यता देऊन तातडीने काम सुरू करण्याची मागणी केली होती. त्यामुळे या पैनगंगा नदीकाठच्या विदर्भ आणि मराठवाड्यातील ५० गावांमध्ये प्रचंड असंतोष आहे. या विरोधात आठ दिवसापूर्वी मराठवाड्यातील हिमायतनगर तालुक्यातील शिरपल्ली येथे विदर्भ, मराठवाड्यातील प्रकल्प विरोधकांची संयुक्त सभा पार पडली. यामध्ये मराठवाडा आणि विदर्भातील सात हजारपेक्षा अधिक महिला पुरुष या सभेला उपस्थित होते. या ठिकाणी सर्वांनीसहस्त्रकुंड प्रकल्पाला कडाडून विरोध दर्शविला. शनिवारच्या पुरात सावळेश्वर गावाचे सर्वाधिक नुकसान झाले. त्याची पाहणी करण्यासाठी आमदार वानखेडे सावळेश्वर गावात गेले, तेव्हा गावकऱ्यांनी सहस्त्रकुंड प्रकल्प संदर्भात काय मागणी केली? असे विचारत त्यांना धारेवर धरेल. दोन तास पाऊस कोसळला तर पूर परिस्थिती निर्माण झाली. प्रकल्प झाला तर गाव पाण्याखाली जाईल, अशी भीती व्यक्त केली.

कोणाच्या दबावाखाली धरणाची मागणी केली ? आम्हाला धरण नको आहे. या परिसरातील कसदार जमीन आहे. आदी सवाल  वानखेडे यांना  नागरिकांनी ‘जान देंगे मगर जमीन नही देंगे’, अशा घोषणा दिल्या. यावेळी आमदार वानखेडे यांनी सावळेश्वर, बोरी व मानकेश्वरच्या नागरिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी मी हे करीत नसून मला निवडून दिलेल्या  जनतेसाठी हे करत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, उमरखेड विधानसभा मतदारसंघात पावसामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात आढावा घेण्यासाठी  मंगळवारी आमदार किसन वानखेडे यांनी उमरखेड पंचायत समिती सभागृहात दुपारी २ वाजता अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

झाडावरचे भूत अंगावर घेऊ नका!

सहस्त्रकुंड धरण यापूर्वी दोनवेळा रद्द झाले आहे. आता हदगाव व उमरखेडच्या आमदारांनी हा प्रकल्प झाला पाहिजे म्हणून महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधले आहे. या दोन्ही आमदारांनी ‘झाडावरचे भूत अंगावर घेवू नये’, असा सल्ला माजी आमदार तथा भाजप नेते प्रकाश पाटील देवसरकर यांनी दिला आहे. या प्रकल्पात सुपीक जमीन यामध्ये जाणार असून शेतकरी उद्धवस्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे हा प्रकल्प नकोच, अशी प्रतिक्रिया प्रकाश पाटील देवसरकर यांनी दिली.