scorecardresearch

नागपुरात साकारला ‘पन्हाळगड’

कोल्हापूरपासून २१ किलोमीटर दूर अंतरावरील पन्हाळगड साकारला

नागपुरात साकारला ‘पन्हाळगड’
कोल्हापूरपासून २१ किलोमीटर दूर अंतरावरील पन्हाळगड साकारला

तरुणाईची मातीशी नाळ जोडण्यासाठी उपक्रम

स्पर्धा त्यांच्यासाठी महत्त्वाच्या नाहीत, तर किल्ल्यांबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी हा त्यांचा उद्देश आहे. तरुणाईची ऊर्जा वायफळ खर्च होण्याऐवजी मातीशी त्यांची नाळ जोडली जावी, यासाठी तरुणाईच प्रयत्नशील आहे. गेल्या सहा-सात वर्षांपासून प्रयत्न करीत असलेल्या तरुणाने कंपनीतील नोकरीवर पाणी फेरले. याच तरुणाने त्याच्या मित्राच्या सहाय्याने बजाजनगरातील ‘विष्णूजी की रसोई’ येथे साकारलेला पन्हाळगड किल्ला आणि त्याचे सादरीकरण नागपूरकरांच्या कौतुकास पात्र ठरले आहे.

विशाल देवकर हा नागपुरातील तरुणाईची मातीशी नाळ जोडली जावी म्हणून सतत किल्ल्यांचे उपक्रम राबवतोय. त्याच्यासाठी दिवाळी हे निमित्तमात्र आहे, कारण वर्षभर तो किल्ले तयार करण्याचा उपक्रम राबवतोय.

यावेळी त्याने कोल्हापूरपासून २१ किलोमीटर दूर अंतरावरील पन्हाळगड साकारला. हा किल्ला सध्या नागपूरकरांच्या कौतुकाची थाप घेऊन जातोय, कारण किल्ल्याची हुबेहूब जिवंत प्रतिकृती त्याने अभिषेक सावरकर या त्याच्या मित्राच्या सहाय्याने उभी केली.

त्यासाठी तब्बल दोन दिवस त्याने पन्हाळगडला मुक्काम ठोकला. किल्ल्याचे प्रत्येक बारकावे नजरेत टिपले. पुस्तकांमधून त्या किल्ल्याचा इतिहास जाणून घेतला आणि त्यानंतरच त्याने तब्बल १४ दिवस अभिषेकच्या मदतीने पन्हाळगड तयार केला. २५ बाय १५ आकाराच्या या किल्ल्याची उंची सहा फूट आहे. या किल्ल्याकरिता सहा ट्रक माती आणि एक ट्रक बोल्डरचा वापर त्यांनी केला.

या हुबेहूब प्रतिकृतीने अनेकांना अचंबित केले. विशेष म्हणजे, पन्हाळगड ते विशालगड ही शिवाजी महाराजांची वारी, बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली खिंड याचे प्रात्यक्षिकही याठिकाणी उभारले आहे. विजयराव देशमुख यांच्या हस्ते किल्ल्याचे उद्घाटन करण्यात आले. आजच्या तारखेला गडकिल्ले बोलायला लागले तर काय व्यथा मांडतील? त्यामुळे किल्ल्यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी एकपात्री नाटकाचा प्रयोगही त्यांनी सोमवारी साकारला, ज्याला नागपूरकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. विशालचे बहुतांशी सण किल्ल्यांवरच जातात, कारण जवळजवळ वर्षभरच तो किल्ल्यांच्या भेटीवर असतो.

गेल्या सहा वर्षांपासून दसऱ्याला तो कधीच घरी राहिलेला नाही. पदव्युत्तर शिक्षणानंतर त्याला नोकरीही लागली, पण किल्ल्यांसाठी सुटय़ा मिळत नव्हत्या म्हणून त्याने नोकरीवर पाणी फेरले.

अभिषेक सावरकरने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. तो सुद्धा आता विशालसोबत गडकिल्ल्यांचा इतिहास किल्ल्यांच्या प्रतिकृतीतून समोर आणण्यासाठी काम करीत आहे.

किल्ल्यांविषयी आत्मीयता निर्माण करण्याची गरज

कितीही पैसा खर्च केला तरी जोपर्यंत किल्ल्यांविषयी आत्मीयता निर्माण होणार नाही, तोपर्यंत ऐतिहासिक किल्ल्यांचे रक्षण होणार नाही. म्हणूनच वर्षभर किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारून तरुणाईच्या मनात किल्ल्यांबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी आणि किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ते समोर यावेत, यासाठी गेल्या सहा-सात वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. स्पर्धा हे निमित्तमात्र आहे, पण महाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा हा उद्देश आहे, असे विशाल देवकर म्हणाला.

कायमस्वरुपी किल्ल्याची निर्मिती

महालमध्ये राज्याभिषेक सोहोळ्यात प्रत्येकवेळी किल्ला तयार केला जातो. गणेशोत्सवादरम्यान विशालने महालच्या राजासमोर सहा किल्ले तयार केले. पारडीला अंबादेवीजवळ गुडीपाडव्यादरम्यान त्याने किल्ल्याची निर्मिती केली. गीता मंदिरजवळ एनआयटी क्रीडा संकुलात लहान मुले शिकायला येतात. त्यांच्यावर आतापासूनच महाराष्ट्राच्या किल्ल्यांच्या इतिहासाचे संस्कार घडावेत म्हणून कायमस्वरूपी सिमेंटच्या किल्ल्याची निर्मिती केली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-10-2017 at 03:31 IST

संबंधित बातम्या