नागपूर : सातारा येथे १ ते ४ जानेवारीदरम्यान होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची निवड करण्यात आली. परंतु, ही निवड करताना साहित्य महामंडळाच्या घटनात्मक तरतुदींचेच ‘पानिपत’ झाल्याचे समोर आले आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक रविवारी पुण्यात झाली. महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या बैठकीत संमेलनाध्यक्ष म्हणून विश्वास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. परंतु, असे शिक्कामोर्तब करण्याआधी संमेलनाध्यक्ष निवडीबाबत महामंडळाच्या घटनेत जे निकष ठरवून देण्यात आले आहेत ते पाळण्यात आले नसल्याचे कळते.

तर अध्यक्षपद अवैध ठरेल

घटक संस्थांच्या कार्यकारी मंडळाकडून रीतसर ठराव घेऊन संमेलनाध्यक्षपदासाठीची संभावित नावे महामंडळाकडे गेली नसतील व ती थेट बैठकीत ऐनवेळी समोर करून त्यातून एकाची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असेल तर ही निवडच मुळात अवैध ठरते. महामंडळाच्या घटनात्मक तरतुदींचा हवाला देत याविरुद्ध कुणी न्यायालयात दाद मागितली तर पाटील यांचे अध्यक्षपद धोक्यात येऊ शकते, असे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले.

नियमांना छेद

महामंडळाच्या घटनेनुसार, सर्व घटक संस्थांनी संमेलनाध्यक्षासाठी सुयोग्य अशी तीन नावे व संलग्न, सहयोगी संस्थांनी प्रत्येकी एक नाव बैठकीच्या आधी घटक संस्थांच्या कार्यकारी मंडळाच्या ठरावासह महामंडळाकडे पाठवणे आवश्यक आहे.

याशिवाय निमंत्रक संस्थेने व वर्तमान संमेलनाध्यक्षांनीही एक नाव सुचवणे अपेक्षित आहे. नाव निश्चित करण्यासाठी घटक संस्थांच्या कार्यकारी मंडळाची सभा कधी झाली याचा स्पष्ट उल्लेख महामंडळाकडे पाठवल्या जाणाऱ्या ठरावात हवा.

पाटील यांची निवड करताना या संपूर्ण प्रक्रियेलाच फाटा देत थेट बैठकीतच नावे मागवण्यात आली. त्यातही बहुतेक घटक संस्थांकडून पाटलांचे नाव येईल, याची पद्धतशीर तजवीज करण्यात आल्याचे समजते.

घटक संस्थांनी तसेच महामंडळातील सर्व समाविष्ट, संलग्न संस्थांनी विश्वास पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी अग्रक्रमाने सुचवले होते. त्यामुळे विश्वास पाटील यांची सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. निवड प्रक्रियेसाठी आवश्यक सर्व घटनात्मक तरतुदींचे पालन करण्यात आले. प्रा. मिलिंद जोशीअध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ.