बुलढाणा : अमरावती महसूल विभागातील बुलडाणा, अकोला आणि अमरावती या तिन जिल्ह्याच्या सिमेवर बांधण्यात आलेल्या वान सिंचन प्रकल्प अर्थात भैरवगड हनुमान सागरात तब्बल ९१ टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे.

सातपुडा परिसरात संततधार पाऊस कोसळत आहे. यामुळे वान धरणातील जलसाठ्यात वाढ होत आहे. यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता हनुमान सागराचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील नदिकाठाच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

दोन दरवाजातून ८२.७३ दलघमी प्रति सेकंदने वाननदी पात्रात पाणी विसर्ग सुरू आहे. वान प्रकल्पातुन पाणी वान नदि पात्रात सोडण्यात येत असल्याची माहिती वान प्रकल्प पूरनियंत्रण कक्ष विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क रहावे

नदी पात्र ओलांडू नये पाणलोट क्षेत्रातुन येणाऱ्या पाण्याचा आवकनुसार सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये कमी जास्त प्रमाण आवश्यक बदल करण्यात येईल. वान नदी काठावरिल गावातील नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन वान प्रकल्प पुरनियंत्रण कक्ष विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

जलसाठ्यात सतत वाढ

दरम्यान हनुमान सागर या बृहत प्रकल्पच्या जल साठ्यात सतत वाढ होत आहे. मागील २५ ऑगस्ट रोजी या प्रकल्पत ७९ टक्के जलसाठा उपलब्ध झाला होता. यामुळे धरणातून विसर्ग सोडण्यात येत असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील मोमीनाबाद व रिंगणवाडी (तालुका संग्रामपूर ) या गावांचा इतर गावांशी असलेला संपर्क तुटला होता. तेंव्हा वान नदी दुथडी भरून वाहत असल्याने नदीकाठच्या शेकडो हेक्टर शेत व केळीच्या बागात पुराचे पाणी शिरले होते.

सातपुडा पर्वत परिसरात कोसळधार पाऊस बरसत असल्याने २४ ऑगस्टला सायंकाळी २ वक्र द्वारे उघडण्यात आली. ५० से मी प्रति सेकंद असा विसर्ग वाननदी पात्रात सोडण्यात येत असल्याने पूर आला होता. तसेच मोमीनाबाद (उबर्डी ) दरम्यानच्या रिंगणवाडी कोल्हापुरी बंधाऱ्याची समस्या पुन्हा एकदा समोर आली होती. हा बंधारा कमी उंचीचा असल्याने या बंधाऱ्या वरुन ६ फुट पाणी वाहत होते. यापरिनामी मोमीनाबाद व रिंगणवाडी गावाचा इतर गावांशी असलेला संपर्क तुटला होता. यामुळे जनजीवन विस्कळीत होऊन कोल्हापुरी ब बंधाऱ्या वरून पाणी वाहत असल्याने पायी जाणे देखील अशक्य ठरले होते.

नदी काठावरील रिंगणवाडीची शेती मोमीनाबाद शिवारात असल्याने रिंगणवाडी येथील शेतकऱ्यांची रासायनिक फवारणी, निंदण ची कामे प्रभावीत झाली होती. शेतकरी संतोष रावनकार , वसंता रावणकार , सारंगधर रावणकार , नारायण बोरवार, प्रविण देऊळकार याच्या केळी बागात पाणी घुसल्याने संबंधीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. रिंगणवाडी मोमिनाबाद या दोन गावा दरम्यान मिनी कोल्हापूर बंधारा बांधण्यात आला. मात्र पुल बंधाऱ्याची उंची कमी असल्याने वान नदीला पूर आल्यास मोमिनाबाद रिंगणवाडी दरम्यान कोल्हापुरी बंधाऱ्या वर बांधलेल्या मिनी पुलावर पाणी राहते त्यामुळे मोमिनाबाद उंबर्डी या गावाचा संपर्क तुटतो.