वर्धा : पालिका निवडणूक म्हणजे गोंधळ आलाच. प्रत्येक उमेदवार ही निवडणूक स्वतःची प्रतिष्ठा पणास लावून लढतो. पण त्याच्यावर आक्षेप व आरोप करीत त्याचे विरोधक जेरीस आणतातच. निवडणूक अर्जाची वैधता तपासण्याचा मंगळवार शेवटचा दिवस. याच दिवशी अनेकांनी आक्षेप नोंदविले. पण एका अर्जवर निर्णय देण्यास निवडणूक अधिकाऱ्यांची कसोटी लागली. आज पहाटे २ वाजता अखेर निर्णय झाला.
भाजपतर्फे नगराध्यक्षपदासाठी दावेदारी करणारे माजी पालिका उपाध्यक्ष प्रदिपसिंह ठाकूर यांनी दावा परत घेतला. मात्र प्रभाग ९ मधून त्यांनी नगरसेवकपदासाठी अर्ज कायम ठेवला. त्यांचे विरोधक काँग्रेस उमेदवार महेश तेलरांधे यांनी ठाकूर यांच्या अर्जावर गंभीर आक्षेप घेत त्यांना निवडणुकीतून बाद ठरविण्याची मागणी निवडणूक कार्यालयास केली. त्यावर दुपारी ५ वाजता सुनावणी झाली. मात्र निर्णय झाला नाही. निकाल काय ते सांगणार नाही, थेट अर्ज वैध की अवैध याची यादी लागणार, असे उत्तर मिळाले. आज पहाटे त्याबाबत बोर्डावर माहिती देण्यात आली.
आक्षेप असे की प्रदीप ठाकूर यांनी शपथपत्रावर खोटी माहिती दिली आहे. त्यांच्यावर ३६ गुन्हे दाखल असून ती माहिती लपविण्यात आली आहे. पालिकेच्या इंदिरा मार्केटमध्ये त्यांचे १० दुकाने आहेत. त्यावर कर थकीत आहे. जिना तोडून बाथरूम बांधले असून अन्य अवैध बांधकामे ठाकूर यांनी केलीत. शहरातील निधी ग्रामीण भागातील कामावर खर्च केला. अन्य असे गंभीर आरोप तेलरांधे यांनी केले. ते म्हणतात निवडणूक आयोगाने हे तपासले नाही. ही बाब यापूर्वीच्या निवडणुकीत पण उपस्थित केली होती. न्यायालयाने त्यांना दोषी मानले. तेव्हा ही बाब नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात सुनवाईस आली होती. पण पळवाट काढून निर्णय झाला. आताही आमचे हे आक्षेप कायम आहेत.
तर प्रदीप ठाकूर म्हणतात सदर विरोधकास ही नेहमीचीच सवय आहे. मी दिलेली माहिती संपूर्ण सत्य आहे. माझ्या नावावर एकच दुकान असून कर भरलेला आहे. तसेच एकच गुन्हा दाखल असून त्याची माहिती शपथ पत्रात दिली आहे. नाहक आक्षेप घेत निवडणूक कार्यालयाचा वेळ वाया घालविण्याचा हा प्रकार ठरतो. न्यायाची बाजू राखल्या जाईल, असा विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला.
निवडणूक कार्यालयाने ठरल्यानुसार आज पहाटे २ वाजता वैध अर्जाची यादी जाहीर केली. त्यात तेलरांधे यांचे आक्षेप फेटाळून ठाकूर यांचा अर्ज वैध ठरविला आहे. याबद्दल ठाकूर समर्थकांनी आनंद व्यक्त केला. तर तेलरांधे म्हणतात हे दबावतंत्र आम्ही चालू देणार नाही. आज दुपारी न्यायालयात दाद मागणार. सर्व त्या अवैध बाबी न्यायालयासमोर मांडणार. प्रदीप ठाकूर यांच्यातर्फे अँड. वल्लभ चौबे यांनी बाजू मांडली. तर तेलरांधे यांची बाजू अँड. आनंद देशपांडे यांनी लावून धरली. हे प्रकरण पुढे चांगलेच तापणार, अशी चिन्हे दिसू लागत आहे.
