वर्धा : महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पुनीत वर्धा जिल्हा ऐतिहासिक ठेवा राखून आहे. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यास जगभरातून हजारो पर्यटक व विचारवंत या गांधी जिल्ह्यास भेटी देत असल्याची नोंद सेवाग्राम आश्रमाच्या अभ्यागत पुस्तिकेत होत असते. जिल्ह्याला राष्ट्रपिता महात्मा गांधी व भूदान यज्ञाचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाते. वर्धा हा राज्यातील एक महत्त्वाचा जिल्हा समजल्या जातो.

ही ऐतिहासिक ठेव जपण्याचा प्रयत्न केंद्र व राज्य शासन पातळीवार होतो. हे वातावरण निरामय असावे, म्हणून केंद्र शासनाने तीन तपापूर्वी एक आदेश काढून प्रदूषण निर्माण करणारे उद्योग उभारण्यास मनाई करून टाकली. तरी पण विविध प्रकारे प्रदूषण होत आहेच. त्यात प्रामुख्याने बस सेवा असल्याचे म्हटल्या जाते. ते पाहून प्रदूषणमुक्त शिवाई ई बस सेवा जिल्ह्यात सुरू करावी, अशी मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली.

राज्य सरकार प्रदूषणमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. याच प्रयत्नातून राज्यात शिवाई ई बस सेवा सुरू करण्यात आली. सदर सेवा प्रदुषणाला आळा घालण्ण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. वर्धा जिल्हा विदर्भातील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला जिल्हा आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढयाची ज्योत येथूनच प्रखर करण्यात आली. स्वातंत्र चळवळी मध्ये जिल्हा देशाचे केंद्र स्थान होता. याशिवाय पांडव कालीन सिद्धी विनायक मंदिर केळझर येथे असून बौद्ध विहार, दर्गा, गिरड येथे फरीदबाबा, बोर अभ्यारण्य व अन्य महत्वपूर्ण स्थळे जिल्ह्यात असल्याने दरवर्षी हजारों पर्यटक जिल्ह्याला भेट देतात. शिवाय जिल्ह्यातील व अन्य जिल्ह्यातील नागरिकदेखील सेवाग्राम येथे कस्तुरबा मेडिकल कॉलेज असल्याने उपचारासाठी दररोज येत असतात. हे वातावरण निरोगी रहावे म्हणून जिल्ह्यात प्रदुषणमुक्त शिवाई ई बस सेवा सुरू करावी, अशी मागणी पालकमंत्री डॉ. भोयर यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना प्रत्यक्ष भेटून केली.

यावेळी परिवहन मंत्री सरनाईक यांनी वर्धेत शिवाई ई बस सेवा सुरू करण्याबाबत तातडीने निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. गांधी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या वर्धा जिल्ह्यात आता भाजपचे वर्चस्व झाले आहे. पण खुद्द पालकमंत्री डॉ. पंकज भोयर आता या जिल्ह्याची ओळख कायम असावी म्हणून प्रयत्नशील असल्याने समाधान व्यक्त केल्या जात आहे.