वर्धा : शिवस्वराज्यदिनी सुवर्णकलशासह गुढी कशी उभारणार असा प्रश्न पंचायत पुढाऱ्यांना पडला असून प्रशासनाने मात्र शब्दश: अर्थ न घेण्याचे सुचविल्याने संभ्रम आहे. ६ जून रोजी राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचे निर्देश आहेत. ६ जून १६७४ ला शिवराज्याभिषेक झाला होता. या दिवशी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता. हा शुभदिन साजरा करावा म्हणून मागणी होत होती. त्याचा संदर्भ देत या दिवशी कोणता उपक्रम करावा याबाबत एका पत्रातून तपशील देण्यात आला आहे.

कार्यालयात भगवी जरी पताका असलेला ध्वज जिरेटोप, सुवर्णहोन, जगदंब तलवार, शिवमुद्रा व वाघनखे या शिवरायांच्या पंच शुभचिन्हांनी अलंकृत असावा. राजदंडाचे प्रतीक म्हणून १५ फुट उंचीचा बांबू असावा. त्याच्यावर सुवर्ण आणि लाल कापडाची गुंडाळी असावी. तसेच सुवर्णकलश, पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी, अष्टगंध, अक्षता, हळद, कुंकू व ध्वनीक्षेपक हे साहित्य असावे. राजदंडाच्यावर रयतेच्या झोळीत सार्वभौमत्व रिता करणारा ‘सुवर्णकलश’ बांधावा. त्यावर शिवशक राजदंड स्वराज्य गुढी हे अष्टगंधाने लिहून त्यावर अक्षता लावाव्यात. नंतर पुष्पहार, गाठी, आंब्याची डहाळी बांधावी. शिवरायांच्या जयघोषात शिवशक राजदंड स्वराज्य गुढी सरळ उभी करावी. नंतर राष्ट्रगीत व महाराष्ट्रगीत म्हणून सांगता करावी.

हेही वाचा – अभिमानास्पद! दहावी होण्याआधीच ‘एनडीए’चे प्रशिक्षण देणाऱ्या शासकीय संस्थेत प्रवेश, दिव्याचे आकाशात उंच उडायचे स्वप्न…

पण यातील सुवर्णकलश आणायचा कुठून असा प्रश्न काही नव्या पदाधिकाऱ्यांना पडला आहे. जाणत्यांनी मात्र गतवर्षी प्रमाणेच तांब्याचा कलश लावणार असल्याचे सांगितले. नालवाडीचे माजी सरपंच बाळा माऊस्कर म्हणाले की सुवर्णकलश शक्य नाही. गतवर्षी तांब्याचा लावला होता. तसेच निर्देशाप्रमाणे सर्व साहित्यपण शक्य नाही. सोनेरी रंग देवून भागवू, असे ते म्हणाले. तर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फणसे म्हणाल्या की आदेशाचा शब्दश: अर्थ घेण्याचे कारण नाही. ते प्रतिकात्मक आहे. सोयीनुसार कलश लावावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – वाघिणीला वेढा : आणखी १५ चालक, गाईड निलंबित; ताडोबा व्यवस्थापनाची दुसऱ्या दिवशी कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आदेशाबाबत नव्यानेच पदाधिकारी झालेले ग्रामपंचायत पुढारी संभ्रमीत आहे. त्यामुळे त्यांनी खुलासा मागविणे सुरू केल्याचे दिसून येते. कारण शासन आदेशातील नमूद शब्दानुसार अंमलबजावणी करण्याची धारणा आहे, म्हणून हा पेच दिसून येतो.