वर्धा : तापमान सतत वाढत आहे. लाहिलाही होत असल्याने जीवास धोका. त्यातच २३ व २४ एप्रिल रोजी यलो अलर्ट. म्हणजे धोक्याची सूचना. मानव सतर्क होणार पण मुक्या जीवांचे काय, असा प्रश्न असल्याने शेवटी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने ईशारा जारी केला आहे. तो पाळण्याचे दंडक आहे.
प्रामुख्याने पाळीव पशू यांची काळजी घेण्याची सूचना आहे. पशुधन सावलीत ठेवावे. स्वच्छ व थंड पाणी द्यावे, ११ ते ४ दरम्यान काम करवून घेऊ नये, प्राणी आसरा असेल तिथे छतावर आच्छादन, त्यास पांढरा रंग किंवा शेणाचे सारवण, पशुधन शेडमध्ये पंखे, थंड पाण्याचे फवारे सूरू ठेवावे अश्या सूचना आहेत.
अती उष्ण असल्यास पाण्याचे फवारे वाढविणे गरजेचे आहे. जवळपास पाणी स्रोत पाहून त्यांना डुबकी मारू द्या. हिरवे गवत द्या. प्रोटीन फॅट टाळणारा पूरक आहार असावा. मिनरल्स पाणी पण द्यावे. गुलकोज व मीठ मिश्रित पाणी असावे. हे पशुधन थंड हवेतच चरले पाहिजे, अशी खबरदारी घेण्याची सूचना करीत सावधान करण्यात आले आहे.
सामान्य नागरिकांना पण खबरदार करण्यात आले आहे. दुपारी श्रमाची कामे टाळा. उन्हात जाऊ नका. अणवानी फिरू नका. उष्णता जाणवत असेल तर स्वयंपाक टाळा. स्वयंपाक घर हवेशीर राहण्याची काळजी घ्या. शितपेये टाळा तसेच चहा कॉफी व अल्कोहोल पण. शिळे अन्न खाऊ नये. लहान मुलांना बंद वाहनात ठेवू नये. नाहक उष्णता निर्माण करणारे ब्लब बंद ठेवा. गडद रंगाचे व घट्ट कपडे टाळा, अश्या वर्जित सूचना आहेत.
नोकरदार व कामगार यांना थंड पाणी देण्याची तंबी कंपनी मालकांना देण्यात आली आहे. कामगारांना थंड थंड हवेची जागा, स्वच्छ पाणी, फर्स्ट एड बॉक्स, आईस पॅक, ओरएस पुरविण्याची सूचना आहे. काम अश्या वेळेत सांगा की तापमान कमी राहील. उघड्यावर काम करवून घ्यायचे असेल तर कामाच्या वेळा कमी व विश्रांती कालावधी वाढविण्याची सूचना आहे. नव्याने काम करीत असलेल्यांना कमी काम द्या व हलके काम देण्याचे सुचविण्यात आले आहे. दिलेल्या सूचना बाबत संबंधित यंत्रणा यांनी खबरदारी घेण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.