Karale master news : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा २० सप्टेंबरला वर्ध्यात होत आहे. केंद्र शासनाच्या विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांसाठी चेक व साहित्याचे वाटप त्यांच्या हस्ते होणार आहे. सरकारी कार्यक्रम असल्याने जिल्हाधिकारी राहुल कर्डीले व त्यांची चमू झटत आहे. स्वावलंबी येथील मैदान युद्धस्तरावर तयार करण्यात येत आहे. मात्र, हे मैदान सततच्या पावसाने चिखलमय झाले. म्हणून त्यात भराव टाकण्यासाठी विविध साहित्य मोठ्या प्रमाणात उपयोगात येत आहे.
या मैदानावर अडीच फूट रुंदीचा मुरूमचा बेड तयार केल्या जात आहे. त्यासाठी महसूल प्रशासनाने रोज ५०० ट्रक मुरूम येलाकेली व जामठा शिवारातून आणणे सुरू केले आहे.
मुरूम विना रॉयल्टी टाकण्यात आला
‘खदखद गुरुजी’ म्हणून समाज माध्यमावर परिचित कराळे मास्तर यांनी या प्रकारावर तीव्र आक्षेप घेतले आहे. त्यांनी माध्यमांवर याबाबत आरोप केला की हा मुरूम बिना रॉयल्टीने सुरू आहे. ज्यांना कंत्राट मिळाले त्यातील काही ठेकेदार रेती उपसा प्रकरणात ब्लॅक लिस्टेड करण्यात आले आहे. प्रशासनाची परवानगी न घेता, रॉयल्टी न फाडता वेगाने मुरमाची वाहतूक होत आहे. एकाही गाडीचे कागदपत्र तपासल्या जात नाही. ही लोकांच्या पैशाची लूट आहे. एका तासाच्या मोदींच्या सभेसाठी करोडो रुपयाची उधळण होत आहे. गावात शेतातील विहिरीचा मुरूम घरी नेण्यासाठी परवानगी लागते. गाडी जप्त व एक लाखाचा दंड आकारल्या जातो. आतापर्यंत १० हजार ब्रास मुरूम विना रॉयल्टी टाकण्यात आला. त्यात हे सर्व ट्रक ओव्हरलोड होते. काही गाड्यांची मुदत संपली आहे, असा आरोप कराळे गुरुजी करतात. हे थांबविण्यासाठी त्यांनी स्वतः काही गाड्या अडविल्या. त्या तपासल्या. कागदपत्र नव्हती असा आरोप ते करतात.
हेही वाचा -‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांची चिंता वाढणार, सर्वच परीक्षा लांबणार?
हेही वाचा – नागपूर : तब्बल २५ दिवसांनी काढला ‘तिचा’ पुरलेला मृतदेह; प्रियकराने १६ ऑगस्टला…
यावेळी वादावादी पण झाली. काही गाडी मालक संतापून त्यांना मारण्यासाठी धावले. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांनी ट्रक मालकांची बाजू घेतली. सर्व गाड्या सोडून दिल्या. शासकीय कामात अडथळा म्हणून कराळे मास्तर यांच्यावर सावंगी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे. पण या प्रकरणावर जिल्हाधिकारी यांनीच पत्रकार परिषद घेऊन खुलासा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. रस्त्यासाठी पैसे मागितले तेव्हा शासन पैसे नसल्याचे उत्तर देत होते. आता इतका पैसा कुठून आला, असा प्रश्न गुरुजी जाहीरपणे करतात.