वर्धा : राज्य कुस्तीगीर परिषद पुन्हा एकदा वादाच्या वाळणावर गेली आहे. राज्यातील या बलाढ्य संघटनेवर ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांचे अनेक वर्षांपासून वर्चस्व राहले. पण २०१४ नंतर स्थिती पालटली. त्यांचे पत्ट्टशिष्य म्हटल्या जाणारे विदर्भ केसरी रामदास तडस हे भाजपवासी झाले आणि घडामोडी वाढल्या. कुस्ती महर्षी म्हणून ओळखल्या जाणारे मामासाहेब मोहोळ यांनी कुस्ती सामने आयोजित करण्यास सुरवात केली होती. सहा दशकापासून महाराष्ट्र केसरी स्पर्धा ते भरवीत होते. पुढे गटबाजी वाढली. दोन गट पडले. त्यातच भाजपचे खासदार झालेले रामदास तडस हे राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यांना राष्ट्रीय कुस्तीगीर परिषदेची मान्यता पण मिळाली. तडस हे काका पवार व धवलसिंह मोहिते पाटील यांनी अर्ज परत घेतल्याने बिनविरोध अध्यक्ष निवडल्या गेले होते.
तडस अध्यक्ष तर काका पवार सचिव व संजय शिंदे हे कोषाध्यक्ष झाले. ही घडामोड २०२२ वर्षातील. मात्र आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे अध्यक्ष झाल्याची घडामोड जाहीर झाली. ते अध्यक्ष तसेच विजय बाराटे व अन्य पदाधिकारी निवडल्या गेल्याची घोषणा करण्यात आली. खुद्द रोहित पवार यांनी हा नवा अध्याय असल्याची टिपणी केली. तसेच सर्व जिल्हा चमुचे आभार मानत रोहित पवार यांनी महाराष्ट्रात कुस्तीस प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी सर्व ते प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. या संदर्भात पोस्ट टाकणारे काँग्रेस नेते डॉ. उदय मेघे म्हणतात की आता सर्व बदलले आहे. रोहित पवार हेच अधिकृत अध्यक्ष राहतील. अध्यक्ष पवार यांच्यासोबत वर्धा जिल्हा कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणी सदस्यासोबत भेट घेतली. यावेळी उपाध्यक्ष कोहळे उपस्थित असल्याचे उदय मेघे नमूद करतात.
तर या घडामोडीवर बोलतांना माजी खासदार व राज्य कुस्तीगीर परिषद अध्यक्ष रामदास तडस म्हणतात की रोहित पवार कार्यकारिणी बेकायदेशीर आहे. त्यांना कुठलीच मान्यता नाही. ते सामने घेऊ शकणार नाही. राष्ट्रीय व ऑलिम्पिक स्पर्धेत त्या संघटनेचे खेळाडू सहभागी होवू शकणार नाही. त्यामुळे आमची संघटना हीच कुस्तीपटुंची खरी संघटना आहे. त्यावर कायदेशीर शिक्कामोर्तब झाले आहे. केवळ एखाद्या भव्य स्टेडियमवर ताबा मिळावा म्हणून कोणी काही खटाटोप करत असतील, तर ते व्यर्थ, असे तडस स्पष्ट करतात