नागपूर : सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था व अभिमनत विद्यापीठ लवकरच अदानी समूहाकडे जाण्याचे संकेत आहे. त्याबाबतच्या वाटाघाटी अंतिम टप्यात असल्याच्या वृत्ताला खुद्द आमदार समिर मेघे यांनीही दुजोरा दिला. ही प्रक्रिया यशस्वी झाल्यास अदानी विदर्भातील वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात प्रवेश करणार आहे.

दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था व अभिमत विद्यापीठाच्या अखत्यारित वैद्यकीय, आयुर्वेद, दंतसह इतरही बरेच वैद्यकीय महाविद्यालय आहे. ६ मे २०२५ रोजीच्या जवळपास सावंगीतील विद्यापीठाच्या रुग्णालयाला प्रीती गौतम अदानी यांनी भेट दिली होती. यावेळी त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांना भेट देत तेथील सोयी- सुविधांचीही माहिती घेतली होती. त्यांनी येथील रुग्णसेवेशी संबंधित सोयींची प्रशंसाही केली होती. या भेटीदरम्यान हे विद्यापीठ अदानी समूह घेण्यास उत्सूक असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु त्याला दुजोरा मिळत नव्हता.

दरम्यान अदानी समुहाच्या सातत्याने सावंगीतील या अभिमत विद्यापीठ घेण्याबाबतच्या वाटाघाटी सुरू आहेत. त्या अंतिम टप्यात असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे लवकरच हे विद्यापीठ अदानीकडे हस्तांतरीत होण्याचे संकेतही मिळत आहे. दरम्यान या विषयावर आमदार समिर मेघे म्हणाले, हे विद्यापीठ अदानीकडे हस्तांतरीत करण्याबाबतच्या वाटाघाटी शेवटच्या टप्यात असल्यास तरी अद्याप कशी प्रक्रिया होणार व काय होणार हे स्पष्ट झालेले नाही. त्याला आणखी काही दिवस लागू शकतात. गुरूवारी संस्थेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांशी या विषयावर चर्चाही केली जाणार आहे. तर शालिनीताई मेघे हाॅस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरचे सीईओ (आरोग्य) डॉ. अनुप मरार म्हणाले, याबाबतच्या अदानीसोबतच्या वाटाघाटी आताही सुरू आहे. परंतु काहीही झाल्यास त्याचे प्रसिद्धीपत्रक शुक्रवारी विद्यापीठ प्रशासनाकडून प्रसिद्धीमाध्यमांना दिले जाईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभिमत विद्यापीठाबाबत…

दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी) ला २४ मे २००५ रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाने अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्रदान केला. अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर लगेचच, डीएमआयएमएस (डीयू) ने राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेकडून तपासणीचा पर्याय निवडला आणि त्यानुसार नॅक च्या पीअर टीमने मार्च २००७ मध्ये डीएमआयएमएस (डीयू) कॅम्पस आणि त्याच्या घटक युनिट्सची तपासणी केली आणि डीएमआयएमएस (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी) ला ‘अ’ ग्रेडसह मान्यता दिली. त्यानंतर, मे २०१३ मध्ये, भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने देशातील अभिमत विद्यापीठांमध्ये दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी) ला ‘अ’ ग्रेडचा दर्जा प्रदान केला.