आर्थिक अडचणीमुळे अनुसूचित जातीतील विद्यार्थी उच्च शिक्षणात मागे पडू नये म्हणून दिल्या जाणाऱ्या भारत सरकारच्या मेट्रिकोत्तर शिष्यवृत्तीची  परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याचे उघडकीस आले आहे. वर्धा समाज कल्याण कार्यालयाच्या शिष्यवृत्ती खात्यातून ७२ लाख ८६ हजार २२४ रुपये काढण्यात आले असून ती रक्कम कुठे गेली, याची नोंद कार्यालयातही नाही.

या प्रकरणाची विभागीय पातळीवर दोन महिन्यांपासून चौकशी सुरू  आहे. परंतु त्यातून अद्यापतरी काहीही निष्पन्न झालेले नाही.  भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देते. त्यासाठी वर्धा सहायक आयुक्त  कार्यालयाचे खाते अ‍ॅक्सिस बँक, वर्धा येथे आहे. खाते क्रमांक ९१६०१००५७४०४४७२ मध्ये ३१ मे २०२० रोजी ३६ लाख ३३ हजार ८८५ एवढी शिल्लक रक्कम होती. दरम्यान, सन २०१६-१७ व २०१७-१८ या शैक्षणिक कालावधीतील ज्या महाविद्यालयाची व विद्यार्थ्यांची देयके कोषागारातून पारित झाली, परंतु त्यांचे आयएफएससी कोड व बँक खाते क्रमांक चुकीचे आहे, अशा विद्यार्थ्यांची व महाविद्यालयांची रक्कम  समाज कल्याण विभागाच्या शिष्यवृत्ती बँक खात्यामध्ये परत आलेली आहे. तसेच जिल्हा चौकशी समितीने नर्सिग कॉलेजची तपासणी केली. त्यात त्रुटी आढळल्याने सन २०१६-१७ व २०१७-१८ शैक्षणिक सत्राची काही महाविद्यालयाची शिक्षण शुल्क रक्कम रोखून ठेवली. यामुळे समाज कल्याण विभागाच्या वर्धा येथील शिष्यवृत्ती बँक खात्यातील शिल्लक रक्कम वाढणे अपेक्षित होते. परंतु असे झाले नाही. उलट या खात्यातून रक्कम काढण्यात आली.

या खात्यातून काढण्यात आलेल्या रकमांचा कोणताही अभिलेख (रेकॉर्ड)  उपलब्ध नाही. ही रक्कम ७ जानेवारी २०२० ते १६ मे २०२० या कालावधीत परस्पर काढण्यात आली आहे.

प्रकरण तपासण्यात येईल आणि चौकशी वेगाने करण्याचे निर्देश देण्यात येतील.

– प्रशांत नारनवरे,आयुक्त, सामाजिक न्याय विभाग.