वर्धा : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वर्धा शहरात भरगच्च कार्यक्रम होता. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व आरटीओ कार्यालय वास्तूचे लोकार्पण, भाजप कार्यालय भूमीपूजन, सावरकर स्मारक अभिवादन, कबड्डी स्पर्धा समारोप प्रसंगी ते उपस्थित राहले. सोबत मंत्रिमंडळातील सहकारी अशोक उईके, प्रताप सरनाईक, डॉ. पंकज भोयर, इंद्रनील नाईक व चारही आमदार यांची उपस्थिती. पण एका मंत्र्याच्या वक्तव्याने लोकं अचंबित झाले. कारण ते सर्वांना चकित करणारे होते.
आरटीओ कार्यालय ई – लोकार्पण प्रसंगी बोलतांना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की मी तब्बल ५२ वर्षानंतर माझ्या जन्मभूमीत येत आहे. माझ्या जन्मगावात येणे झाले नाही. पण आमदार असतांना व आता लोकप्रिय पालकमंत्री असलेले डॉ. भोयर हे मात्र माझ्या जन्मगावाची काळजी घेत असतात. भेट देत अडचणी सोडवितात. त्यांचे आभार, असे सरनाईक म्हणाले. मात्र त्यांनी भाषणात गावाचा उल्लेख कां टाळला, याची उत्सुकतावजा चर्चा झाली. कारण मंत्री सरनाईक आज प्रथमच बोलले की त्यांची जन्मभूमी वर्धा. वर्धेलगत गणेशपूर हे त्यांचे गाव असल्याची माहिती पूढे आली. गाव सोडून मुंबई गाठली आणि सरनाईक यांनी अशक्य ते साध्य केल्याचे लोकं सांगतात.
आज हा संदर्भ देत परिवहन मंत्री असलेले प्रताप सरनाईक भाषणात म्हणाले की आमच्या एसटी डेपोला आता डेपो नं म्हणता बस पोर्ट म्हणता येईल. गाडीत बसून येतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की दर्जेदार काम म्हणून बसपोर्ट असा उल्लेख पुढे झाला पाहिजे. तेच पुढे होणार. राज्यातील सर्व डेपो बसपोर्ट होतील, अशी काळजी घेऊ. आमच्या एस टीचे १५ हजार कोटीचे बजेट आता वाढवून १७ हजार कोटी रुपयाचे झाले आहे. सुसज्ज बसेस सर्व ठिकाणी उपलब्ध करून देणार, अशी ग्वाही सरनाईक यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांचा चिमटा
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जन्मभूमीचा दाखला जाहीरपणे दिला आणि त्याची गमतीदार दखल खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणातून घेतली. जिल्ह्यातील आमदारांनी ५० नव्या बसेस देण्याची मागणी केली होती. तो संदर्भ ठेवत मुख्यमंत्री म्हणाले की परिवहन मंत्री जन्मभूमीत आले त्याचा त्यांना आनंद झाला. जन्मभूमी ही सर्वश्रेष्ठ. म्हणून मागणी करतांना कंजुषी करण्याचे कारण नाही. तुम्ही लोकांनी ५० ऐवजी १०० नव्या कोऱ्या करकरीत बसेसची मागणी केली असती तर ती देखील मान्य झाली असती, असे बोलून मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की बघा, पुन्हा मागणी करता येईल, अशी टिपणी दाद घेऊन गेली.