वर्धा : शिक्षकांची सूचना विद्यार्थी व पालकांसाठी शिरोधार्यच समजल्या जाते. त्यात गुरुजन जर विनंती करीत असतील तर मग त्याचा अंमल होतोच होतो. आता शिक्षक संघटनेने एका पत्रातून साद घातली आहे. विद्यार्थ्यांना संबोधित करणारे हे पत्र आहे. ‘आम्ही शिक्षक बुधवारी सुट्टी घेऊन मोर्चा काढत आहोत – तुमच्या शिक्षणासाठी’.

पत्रातून शिक्षक सांगतात की २५ सप्टेंबरला बुधवारी आम्ही शिक्षक एक दिवसाची सुट्टी काढून जिल्हा मुख्यालयी मोर्चा काढत आहोत. ते का, हे समजून घ्या व आईवडिलांना पण समजावून सांगा. सरकारने जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अश्या शाळेत दोन शिक्षक असल्यास एक शिक्षक काढून घेत तिथे तात्पुरता व्यक्ती प्रथम नियुक्त करायचा व नंतर तो पण काढून टाकायचा. परिणामी शाळा एक शिक्षकी करायची. यामुळे शिक्षण थांबणार. शिक्षक नाही म्हणून विद्यार्थी येणार नाही व विद्यार्थी नाही म्हणून पुढे शाळा बंद करून टाकायची. गरजू गरिबांच्या मुलांना दुसऱ्या गावी शिकायला जावे लागेल. पाच वर्ग तुकड्यांसाठी एक शिक्षक असल्यास चांगले शिक्षण मिळणारच नाही. असे अन्य प्रश्न उभे झाले असल्याचे शिक्षक निदर्शनास आणतात. शाळा सुरू होऊन तीन महिने झालेत. पण अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही. अन्य शालेय साहित्य नाही. शालेय पोषण आहारात रोज वेगवेगळे पदार्थ द्यायला सांगतात. पण आवश्यक ते अनुदान दिल्या जात नाही. शिक्षक हे मुलांना आज छान नवे काही शिकवायचे म्हणून शाळेत येतात. पण शाळेत रोज विविध कागदपत्रे तयार करणे, ऑनलाईन मिटींग्स, ऑनलाईन माहिती व डेटा पुरविणे, वेगवेगळे उपक्रम पुढ्यात असतात.

हेही वाचा – नागपूर मेट्रोत तांत्रिक बिघाड, सेवा खंडित; प्रवाशांची गैरसोय

हेही वाचा – नक्षलवादी चळवळीला हादरा; कमांडर रुपेश मडावी चकमकीत ठार…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अडचणी दूर केल्या पाहिजे, अशी भूमिका शिक्षक या पत्रातून मांडतात. आवश्यक सुविधा द्या, पुरेसा वेळ शिकविण्यासाठी असू द्या. तशी निवेदने दिली. पण सरकार ऐकतच नाही. म्हणून महाराष्ट्रातील सर्व शिक्षक २५ सप्टेंबरला हक्काची रजा घेऊन मोर्चा काढणार आहे. म्हणून बुधवारी शाळेत येवू शकणार नाही. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार. पण ते भरून काढू. शिक्षकांना शिकवू द्या व विद्यार्थ्यांना शिकू द्या, अशी सोपी भावना असल्याचे शिक्षक नेते विजय कोंबे सांगतात.