पाणी मिळत नसल्यामुळे सामाजिक संस्थाचालकांना मन:स्ताप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहराला पुरेल इतका पाणी साठा उपलब्ध असल्याचा दावा महापालिकेच्यावतीने करण्यात आल्यानंतर गेल्या महिन्याभरात शहरातील विविध भागात पाण्याची टंचाई बघता टँकरची मागणी वाढली आहे. शहरातील विविध भागात सामाजिक क्षेत्रात किंवा समाजातील गोरगरीब आणि अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांकडून टँकरची मागणी होत असताना त्यांना टँकर चालकांच्या मनमानीमुळे पाणी मिळत नसून मन:स्ताप सहन करावा लागत आहे. शहरातील उत्तर नागपुरात तर टँकर मिळत नसल्यामुळे पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

गेल्या पंधरा दिवसात तापमानात वाढ होत असताना शहरातील उत्तर, दक्षिण आणि मध्य नागपूरसह अनेक वस्त्यांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली असल्यामुळे टँकरची मागणी वाढली आहे. विशेषत: उत्तर नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये पाण्यासाठी नागरिकांना भटकावे लागत असल्यामुळे वस्त्यांमधून टँकरची मागणी केली जात आहे. शिवाय नागपूर शहरात अनाथ आणि गोरगरीब मुलांसाठी काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्थांना या टँकर चालकांचा फटका बसतो आहे. श्रीकृष्ण नगरातील विमलाश्रमात गेल्या अनेक वर्षांपासून टँकरचा पाणीपुरवठा होत असताना गेल्या काही दिवसांपासून टँकर येत नाही.

दोन ते तीन दिवसांनी आले तरी टँकरमधील अर्धे पाणी उतरविले जाते आणि अर्धे पाणी मात्र दुसरीकडे घेऊन जात असल्याचे समोर आले आहे. श्रद्धानंदपेठ आणि पाचपावलीमधील अनाथ आश्रमात अशीच परिस्थिती असून त्या ठिकाणी टँकर पोहचत नसल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या पाच वर्षांपासून शहरात पाणी पुरवठय़ाची जबाबदारी ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍स या खासगी संस्थेकडे असल्यामुळे २०१५ पर्यंत अर्धे शहर टँकरमुक्त करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक ठिकाणी टँकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. ज्या वस्तीमध्ये दिवसातून एक किंवा दोन फेऱ्या केल्या जात होत्या त्या वस्तीमध्ये तीन ते चार फेऱ्या केल्या जात असताना नागरिकांना पाणी मिळत नाही त्यामुळे हे पाणी जाते कुठे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

दक्षिण नागपुरातील विविध वस्त्यांमध्ये २० ते २२ फेऱ्या होत असताना ती संख्या ३५ वर पोहचली आहे. पूर्व नागपुरातील विविध वस्त्यांमध्ये ४० फेऱ्या होत असताना ६५, दक्षिण पश्चिममध्ये आणि पश्चिम नागपूरमधील विविध वस्त्यांमध्ये ४० च्या आणि उत्तर नागपुरात ६२ च्या जवळपास टँकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. इतक्या मोठय़ा प्रमाणात टँकरने पाणी दिले जात असताना टँकरमधील पाणी कुठे मुरते, याचा शोध घेतला पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.

शहरातील विविध भागात पाण्याची समस्या असली तरी त्या ठिकाणी टँकर पाठविले जात आहे. शहरातील सामाजिक किंवा गोरगरीब मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांना पाण्याची आवश्यकता आणि त्यांना नियमित टँकरचा पुरवठा होत असताना तो तसाच कायम राहील. टँकर चालकांची मनमानी आणि टँकरमधून पुरेसे पाणी दिले जात नसेल त्याची चौकशी करण्यात येईल आणि टँकर चालकांची मनमानी खपवून घेतली जाणार नाही. शहरातील विविध भागात पाणीटंचाई असेल तरी त्यावर उपाययोजना केल्या जात आहे.

संदीप जोशी, सभापती, जलप्रदाय विभाग, महापालिका.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water problem in nagpur due to tanker issue
First published on: 26-05-2016 at 03:37 IST