वाशीम : कडक उन्हाळयाचे दिवस असल्यामुळे हातपंप, नद्या, प्रकल्पासंह विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जिल्ह्यातील २०० गावांपेक्षा अधिक गावात पाणीटंचाईचा अंदाज असून जिल्हा प्रशासनाने १६६ कोटींचा कृती आराखडा तयार केला आहे. मात्र बहुतांश गावे पाणीटंचाईने होरपळत असताना प्रशासन उपयायोजना कधी करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दरवर्षी उन्हाळयाच्या दिवसात जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या उद्भवते. बहुतांश गावातील नागरिकांची मदार विहिरी, हातपंप व खासगी नळ योजनांवर अवलंबून आहे. मात्र कडक ऊन तापत असल्यामुळे गावातील विहरी, हातपंप, नदया कोरडया पडल्या आहेत. तर बहुतांश गावात जलजीवन मिशन योजनेंतर्गत पाईपलाईनचे खोदकाम करण्यात आल्यामुळे गावातील पाईपलाईन फुटल्याने पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांना दूरवरुन पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
हेही वाचा…पोलीस भरतीत अभियंते, डॉक्टर, बी-टेक आणि एमबीएसुद्धा…! वाढत्या बेरोजगारीचा परिणाम
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने १६६ कोटी ७४ लाख रुपयाचा कृती आराखडा तयार केला आहे. त्याअंतर्गत २०५ गावामध्ये १९६ विहिरी अधिग्रहीत केल्या जाणार आहेत. मात्र भर उन्हाच्या तडाख्यात महिलांसह नागरीकांना दूरवरुन पाण्यासाठी पायपीट करावी लागत असतानाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्यामुळे तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.
हेही वाचा…चंद्रपूर : विधानसभेसाठी इच्छुकांची जनसंपर्क मोहिमेला सुरूवात, विधानसभेसाठी इच्छुक सरसावले
भर उन्हात पाण्यासाठी पायपीट, उष्माघाताचा धोका
काही गावातील विहिरी, हातपंप व पारंपारीक पाण्याचे स्त्रोत कोरडे पडली आहेत. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी शेतातील विहिरींवरुन पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. प्रशासनाकडून वाढत्या तापमानामुळे ऊन्हापासून बचाव करावा व उष्माघाताचा धोका टाळावा, असे आवाहन केले जात आहे. परंतू दुसरीकडे ग्रामीण भागातील महिला, मुलींना भर उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र असून अशांना उष्माघातांचा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.