नागपूर : काँग्रेस पक्ष खूपच कमकुवत झाला आहे. तो सत्ताधारी भाजपाला हरवूच शकत नाही. परंतु खोटे बाेलून मुस्लिमांचे मते घेतो. काँग्रेसमुळेच भाजपा आज सत्तेत आहे, अशी टीका ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केली.
ताजाबाद येथे शनिवारी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर जावेद पाशा आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. ओवैसी पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात मुस्लिमांना सर्वाधिक दुर्लक्षित केले गेले. लोकसभेतील भाजपाच्या ३०० खासदारांत एकही मुस्लीम नाही. भाजपा केवळ काँग्रेसमुळे जिंकत आहे. काँग्रेसमध्ये मोदीला थांबवण्याची ताकद उरली नाही. काँग्रेस फक्त धर्मनिरपक्षतेच्या नावावर खोटे बोलून मत घेते. मोदींना हरवायचे असेल तर मोदींच्या काळात अन्याय झालेल्या शेतकरी, गरीब, कष्टकरी, बेरोजगारांना मोदींच्या विरोधात उभे करावे लागेल. आम्ही ते करत आहोत. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवू पाहत आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या सभागृहात म्हटले आम्ही बाबरी मशीद पाडली. त्यामुळे तुम्ही मत देताना यावर गांभीर्याने विचार करा, असे आवाहनही ओवैसींनी केले.




हेही वाचा – वर्धा : नागरी बँकेवर सायबर दरोडा; हॅकिंग करीत सव्वा कोटी केले लंपास
नागपुरात मुस्लिमांसोबत भेदभाव
नागपूर शहरात बऱ्याच झोपडपट्टी भागात सरकारने पट्टेवाटप केले. परंतु मुस्लीम लोकसंख्या असलेल्या वस्तांमध्ये ही योजना अंमलात आणली नाही. सावित्रीबाई फुले, सोनिया गांधी यांच्या नावाने असलेल्या झोपडपट्या अधिकृत होतात. परंतु ताजाबाग, डोबीनगरसह मुस्लिमांंची संख्या अधिक असलेल्या भागात पट्टे वाटप केले जात नाही. हा भेदभाव का, असा प्रश्नही ओवैसी यांनी उपस्थित केला.
राज्यात दंगली वाढल्या
मालेगाव, नांदेड, नगर, जळगाव, औरंगाबाद, अकोलासह इतरही भागात दंगली वाढल्या. अकोलातील दंगलीनंतर तेथे पोलीस अधीक्षकांना आमच्या पदाधिकाऱ्यांनी भेटण्याची वेळ मागितली. परंतु मिळाली नाही. पोलीस अधिकारी आमच्याशी बोलणार नाहीत, विशिष्ट लोकांशीच बोलणार तर पीडितांना न्याय कसा मिळणार? औरंगाबादमध्येही दंगलीचा प्रयत्न झाला. परंतु आमच्या खासदाराने थेट मंदिरात बसून अनुचित प्रकार टाळल्याचेही ओवैसी म्हणाले.
हेही वाचा – वाघांच्या संवर्धनामुळे कार्बन उत्सर्जनात घट, ‘नेचर इकॉलॉजी अँड इव्होल्युशन’चा अभ्यास
जनआक्रोश मोर्चा मुस्लिमांच्या बदनामीसाठी
महाराष्ट्रात भाजपा-संघप्रणित संघटनांकडून हिंदू जनआक्रोश मोर्चे काढण्यात आले. त्यात अल्पसंख्यांक समाजाच्या विरोधात विष पेरले गेले. मुस्लिमांना शिविगाळ केली गेली. प्रत्यक्षात येथे शिंदे-फडणवीस सरकार हिंदुत्वाच्या नावावर आले. केंद्रात ९ वर्षांपासून मोदी सरकारही हिंदुत्वाची गोष्ट करते. मग जनआक्रोश मोर्चे काढण्याची गरज का, असा सवालही ओवैसींनी या सभेत विचारला.