यवतमाळ : काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यास आठवड्याचा कालावधी लोटला. या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या यवतमाळातील पर्यटकांना हिंदु-मुस्लीम ऐक्याचा आणि काश्मिरी मुस्लीम कुटुंबाच्या आदरातिथ्याचा सुखद अुनभव आला. यवतमाळच्या वडगाव परिसरात राहणारे नरेंद्र भांडारकर आणि नागपूर येथील त्यांचे व्याही व इतर तीन कुटुंबातील ११ जण काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते. या संदर्भात बोलताना नरेंद्र भांडारकर म्हणाले, ‘१० दिवस पर्यटन केल्यानंतर २२ एप्रिलला सकाळी आम्ही सर्वजण पहलगाममधील ‘मिनी स्वीत्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात पर्यटनासाठी जाणार होतो. मात्र त्याच दिवशी सायंकाळी जम्मूहून नागपूरसाठी परतीची रेल्वे होती. बैसरन भागात फिरायला गेल्यास जम्मूला पोहचणार नाही, असे सांगून वाहनचालकाने आम्हाला जम्मूकडे निघण्याचा आग्रह धरला. त्यामुळे आम्ही सकाळी १० वाजता नाराजीनेच जम्मूकडे निघालो. दुपारी दोन वाजताच्या सुमारास बैसरन भागात दहशतवादी हल्ला झाल्याचे कळले आणि अक्षरश: उडालोच. आतापर्यंत चालकावर नाराज असणारे आम्ही सर्वचजण त्याला धन्यवाद देवू लागलो. आता जम्मूला सुखरूप पोहचावे म्हणून देवाचा धावा करू लागलो. मात्र आमच्या वाट्याला भलतेच काही आले.

आम्ही प्रवास करीत असलेला रामबन, बनिहाल रस्ता जम्मूतील प्रचंड पावसामुळे खचल्याने बंद झाला. आमचे वाहन बोनीगाम या छोट्याशा गावात अडविण्यात आले. जवळ खाण्यापिण्याचे काहीच साहित्य नव्हते. थंडी प्रचंड असल्याने सर्वजण काळजीत होतो. तेथेच एक छोटे दुकान होते. आमची चर्चा ऐकून दुकानदाराने धीर देत, तुम्हाला हरकत नसेल तर आमच्या घरी मुक्काम करा, अशी विनंती केली. खुर्शीदभाई आणि शाहिस्ता या मुस्लीम कुटुंबाचे ते घर होते. दोघांनीही आमची त्यांच्या घरी राहण्याची व्यवस्था केली. आमच्यासह नागपूरचे काही पर्यटक मिळून आम्ही २१ जण होतो. त्यांच्या घरी पाहुणे असतानाही या कुटुंबाने आपल्या तीन खोल्यांच्या घरात दोन खोल्यांमध्ये आमची व्यवस्था केली आणि हे कुटुंब पाहुण्यांसह स्वयंपाकघरात झोपले. त्या दिवशी खुर्शीदभाई आणि शाहिस्तादीदी आमच्यासाठी खऱ्या अर्थाने देवदूत ठरले.’
भांडारकर यांच्या व्याहाने ही बाब आमदार मोहन मते यांना सांगितली. मते यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना घटनेची माहिती दिली. गडकरी यांच्या कार्यालयातून जम्मूच्या जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले. तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी भांडारकर यांच्या व्याह्यांशी संपर्क साधून आहे तिथेच राहण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या दिवशी रस्ता सुरू झाल्यानंतर पुढील प्रवास करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेवरून बोनीगामचे सरपंच दुसऱ्या दिवशी सकाळी खुर्शीदभाईंच्या घरी पाहोचले. त्यांनी सर्व पर्यटकांची नास्त्याची व्यवस्था केली. राजौरी, पुंछ मार्ग सुरू झाल्याने सर्व पर्यटकांना या मार्गाने जम्मूला रवाना करण्यात आले. तेथून पहाटे ३ वाजता खासगी बस करून सर्व पर्यटक दिल्ली येथे पाहोचले आणि २४ एप्रिल रोजी दिल्लीहून नागपूरला सुखरूप पोहाचले.

काश्मीरमधील मुस्लीम पर्यटकांना देव मानतात

सध्या समाजात हिंदू-मुस्लीम द्वेष पसरविण्याचे काम जोरात सुरू आहे. मात्र काश्मीरमध्ये आम्हाला भेटलेल्या सर्वच मुस्लीम बांधवांनी सहकार्य केले. तेथील मुस्लीम पर्यटकांना देव मानतात. ते पर्यटकांची दिशाभूल करत नसल्याचा अनुभव या १० दिवसांत घेतला. त्यामुळे सरकसट सर्वच मुस्लीमांना दोष देणे चुकीचे आहे. अलीबाबा नावाचा आमचा गाईड होता. त्याने आम्हाला ठिकठिकाणी सतर्क करत मार्गदर्शन केले. कुठेही आमची लुट होवू दिली नाही. आम्ही बोनीगाममध्ये अडकल्यानंतर आमचा, जात, पात, धर्म न विचारता कोणताही परिचय नसताना खुर्शीदभाईं आणि शाहिस्तादिदींनी आम्हाला त्यांच्या घरात राहू दिले. एखाद्या हिंदू कुटुंबाने ओळख-पाळख नसताना मुस्लीम कुटुंबास घरात आश्रय दिला असता का, असा प्रश्न भेडसावत असल्याचे नरेंद्र भांडारकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.