Manoj Jarange Maratha Reservation Protest नागपूर: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात सुरु असलेल्या आंदोलन अखेर मंगळवारी थांबले. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या बहुतांश मागण्या मान्य झाल्या असून जरांगे यांनी केलेल्या प्रमुख आठ मागण्यांपैकी सहा मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्यातील तातडीने अंमलात येणाऱ्या हैदराबाद गॅझेटिअरसंबंधी जीआर देखील काढला आहे. दरम्यान या शासन निर्णयावर ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे काय म्हणाले वाचा.
ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मराठा आरक्षणाशी संबंधित सरकारने काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजाचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचा दावा केला आहे. जेवढे नेते तेवढ्या व्यक्ती. प्रत्येकाचा अभ्यास वेगवेगळा असू शकतो. पण आमच्या मते या प्रकरणी कोणतेही नुकसान झाले नाही. तरीही या प्रकरणी गरज भासली तर न्यायालयात दाद मागितली जाईल, असे ते म्हणाले. राष्ट्रीय ओबीसी महासंघ काल मराठा आरक्षण संदर्भात सरकारकडून काढण्यात आलेल्या शासन निर्णयासंदर्भात समाधानी आहे. मात्र, ओबीसी संघटनांचे साखळी उपोषण आंदोलन लगेच संपवले जाणार नाही. कार्यकर्त्यांशी, कायदेतज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल, अशी माहिती डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिली आहे.
सर्व आधीच्या नियमानुसारच
सरकारकडून काल काढण्यात आलेल्या जीआरमुळे ओबीसीच्या हितांना कुठेही धक्का लागलेला नाही, सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी जरांगे यांची मागणी सरकारने पूर्ण केलेली नाही. आत्ताच्या प्रचलित पद्धतीतूनच आवश्यक दस्तावेज असलेल्या किंवा वंशावळच्या नातेवाईकाचे प्रतिज्ञा पत्र आणणाऱ्या मराठ्यांना ओबीसी म्हणून जात प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हे सर्व आधीच्या नियमानुसारच होत असल्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला कुठेही धक्का बसलेला नाही. असा दावा तायवाडे यांनी केला आहे. भ्रष्ट मार्गाने जात प्रमाणपत्र मिळवले जातील, हा दावाही तायवाडे यांनी फेटाळून लावला आहे. भ्रष्टाचार देशाच्या प्रत्येक क्षेत्रात आहे. आरक्षणासंदर्भात जात प्रमाणपत्र तहसीलदारकडून दिले जाते, तर समाज कल्याण विभागाकडून कास्ट व्हॅलिडीटीसाठी त्याची छाननी केली जाते, त्यामुळे खोटे प्रमाणपत्र दिल्या जाण्याची शक्यता आपोआप कमी होईल, असे ही तायवाडे म्हणाले.
मातृसत्ताक पद्धतीने प्रमाणपत्राचा उल्लेख नाही
बबनराव तायवाडे म्हणाले, आम्ही या प्रकरणी समाधानी आहोत. ओबीसी समाजाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. जी प्रचलित पद्धत आहे, त्याच पद्धतीने जातप्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. मी यापूर्वीही सांगितले आहे की, वडील, पणजोबा, खापरपणजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रांमध्ये कुणबी – मराठा अशी नोंद असेल किंवा वंशावळीचे जे काही नातेसंबंध आहेत, कुणाकडे जातीचे प्रमाणपत्र असेल, वंशावळीत नातेसंबंधांत कुणबी प्रमाणपत्र असेल, तर तुम्हाला अर्ज करता येईल. पण या प्रकरणी मातृसत्ताक पद्धतीने प्रमाणपत्र मिळेल याचा कुठेही उल्लेख नाही. आम्ही आजही दिवसभर कायदेतज्ज्ञांशी सल्ला घेणार आहोत. आमचे उपोषण सुरुच राहणार आहे, असेही बबनराव तायवाडे बोलताना म्हणाले.