यवतमाळ : महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे महाराष्ट्रातील जनतेची घोर निराशा केली. तेव्हाचे मुख्यमंत्री केवळ ‘दूर’दर्शन व समाज माध्यमांतच दिसायचे. प्रत्यक्षात कोणाला भेटायचे नाहीत, अशी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली. ते आज गुरुवारी नेर येथे आयाजित शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्यात अध्यक्षस्थानाहून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, पालकमंत्री संजय राठोड उपस्थित होते.
यावेळी श्रीकांत शिंदे यांनी तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडले. आता मुख्यमंत्री रस्त्यावर उतरून जनतेची कामे करत आहेत. आमदार, खासदारांना मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणीही कामासाठी सहज भेटू शकतो, असे ते म्हणाले. मागील सरकार अडीच वर्षात जे करू शकले ते आताच्या सरकारने दीड वर्षात करून दाखवले आहे. यवतमाळ जिल्ह्यात पालकमंत्री संजय राठोड यांनी विकासाची कामे सुरू केली आहे. लोकांसाठी नवनवीन योजना शासन राबवत आहे.
हेही वाचा – मंत्री गुलाबराव पाटील भर सभेत म्हणाले, ‘आय लव यु…’
हेही वाचा – अभिनेत्री सायली संजीव म्हणते, मला शेतकरी नवरा हवा…
कार्यक्रमास शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार, जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पराग पिंगळे यांनी केले. संचालन प्रा. किशोर राठोड यांनी केले तर आभार मनोज नाल्हे यांनी मानले. मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित आघाडी, काँग्रेस यासह विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.