नागपूर : मुंबई महापालिकेचे ऑडिट होणार असेल तर नक्कीच करा, सोबतच नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे या सर्व महापालिकांचेही ऑडिट करा. शिवाय नगर विकास विभागाच्या गेल्या दीड वर्षांतील कारभाराचे आणि व्यवहाराचेही ऑडिट करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका काही राष्ट्रीय स्वरुपाची नसते. दोन दिवसांपूर्वी पंडित नेहरूंवर अमित शहा यांनी टीका केली, या देशात लोकशाही, संविधान आहे, सेन्सरशिप लावली नाही. राजकीय भूमिका घेऊन कोणी टीका करत असेल आणि त्यावर एखाद्या पक्षाचे लोक गुन्हे दाखल करून अटकाव करण्याचा प्रयत्न करत असेल तर या लोकांना आम्ही आणीबाणीविरुद्ध लढा दिला, असा डंका पिटण्याचा अधिकार नाही, असेही राऊत म्हणाले.

हेही वाचा – मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निरगुडे यांचा राजीनामा स्वीकारण्यास विलंब का? विरोधी पक्ष आक्रमक

दिशा सालियान मृत्यू चौकशीप्रकरणी काय म्हणाले?

दिशा सालीयानप्रकरणी एसआयटी स्थापन करायची असेल, तपास सीआयडीकडे द्यायचा असेल तर द्या, आमची काही हरकत नाही. राजकीय विरोधकांच्या संदर्भात खोटे भ्रम निर्माण करायचे, बदनामी करायची आणि आपली राजकीय पोळी भाजायची हा सत्तापक्षाचा धंदा झाला आहे. हा बदनामी करण्याचा कारखाना आहे, पण आम्ही त्यांना भीक घालत नाही, त्यांना एसआयटी चौकशी करायची असेल तर खुशाल करा, असे संजय राऊत म्हणाले.

२०२४ नंतर सत्ताबदलाचा पुनरुच्चार

लाखो लोक शिवसेनेत आहे. प्रत्येकामागे एसआयटी लावा, राज्यात कायदा सुव्यवस्थेबद्दल काही बोलू नका. २०२४ नंतर सरकार बदलणार आहे, कोणी सत्तेचा अमरपट्टा बांधून आलेला नाही. लोकशाहीमध्ये ही टेम्पररी व्यवस्था आहे, असेही राऊत म्हणाले.

हेही वाचा – “बीएमसीत २५ वर्षांपैकी २० वर्षे सोबत राहिलेले आज चौकशी मागताहेत”, सचिन अहिर यांची टीका; म्हणाले, “आगामी निवडणुका…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांवर दबाव

मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांवर दबाव येत होता. आधी सदस्यांनी राजीनामे दिले, आता मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांवर दबाव येत होता. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला, असेही राऊत म्हणाले. युवा संघर्ष यात्रेच्या समारोपाला आमच्या पक्षाकडून कोणीतरी उपस्थित राहतील. शरद पवार यांचा वाढदिवस आहे, त्यांना उद्धव ठाकरे आणि आम्ही सर्व नेते शुभेच्छा देणार आहोत, असेही राऊत यांनी सांगितले.