नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या निलंबनावरून भाजप कुटुंबातील दोन संघटनांमधील वाद आता चांगलाच पेटला आहे. शिक्षण मंचाच्या अध्यक्षा डॉ. कल्पना पांडे यांनी केलेल्या आरोपाला आता आमदार प्रवीण दटके आणि भाजपचे संघटन मंत्री व अधिसभा सदस्य विष्णू चांगदे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. विद्यापीठाच्या कोणत्याही प्राधिकारणाचे सदस्य नसलेल्या, तसेच ‘एमकेसीएल’चा पूर्वइतिहास माहिती नसलेल्या व्यक्तीने अचानक डॉ. चौधरी व ‘एमकेसीएल’ची बाजू मांडणे संशयास्पद असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

भाजप आमदार प्रवीण दटके, राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य समय बन्सोड, भाजप संघटन मंत्री विष्णू चांगदे, भाजयुमोच्या महामंत्री शिवानी दाणी या सर्वांनी डॉ. सुभाष चौधरींविरुद्ध खोटी माहिती पसरवून विद्यापीठाची बदमामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी डॉ. कल्पना पांडे यांनी पत्रकार परिषदेत केली होती. त्याला आता दटके, चांदगे, बन्सोड आणि दाणी यांनी निवेदनातून पांडे यांच्यावर उलटवार केला आहे.

हेही वाचा – बुलढाणा : बंडखोरांची आता थेट हकालपट्टी; काँग्रेस प्रभारींची घोषणा

निवेदनानुसार, अधिसभा व व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यासाठीच आम्हाला विद्यार्थ्यांनी निवडून दिले. ज्यावेळी ‘एमकेसीएल’ संपूर्ण परीक्षा यंत्रणा वेठीस धरून काम करीत होती, तेव्हा सदस्यांनी त्याविरुद्ध आवाज उठवला होता. २०१६ पासून ‘एमकेसीएल’चा कंत्राट रद्द करावा, यासाठी अधिसभा व व्यवस्थापन परिषदेत चर्चा व ठराव मंजूर झाले आहेत. तत्कालीन कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांच्या कार्यकाळात ‘एमकेसीएल’चा कंत्राट रद्द करण्यात आला होता. परंतु, चौधरी यांनी व्यवस्थापन परिषदेची दिशाभूल करून पुन्हा त्यांना कंत्राट दिले. ही बाब व्यवस्थापन परिषदेत झालेल्या चर्चेतून दिसून येईल. त्यााचे पुरावे देखील आहेत. विद्यापीठाच्या कोणत्याही प्राधिकारणाचे सदस्य नसलेल्या, तसेच ‘एमकेसीएल’चा पूर्वइतिहास माहिती नसलेल्या व्यक्तीने अचानक डॉ. चौधरी व ‘एमकेसीएल’ची बाजू मांडणे संशयास्पद आहे. असाही आरोप केला आहे.

कल्पना पांडे यांचा केविलवाणा प्रयत्न: दटके

डॉ. कल्पना पांडे यांनी पत्रपरिषद घेऊन आमच्यावर केलेले आरोप अत्यंत दु:खदायक आहेत. वास्तविक व सत्य माहिती जाणून न घेता विद्यापीठ प्रशासनातील काही अधिकाऱ्यांना हाताशी घेत त्यांनी निलंबित कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांचा बचाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. आपल्या सोयीची कागदपत्रे डॉ. चौधरी यांनी पांडे यांना देऊन ‘एमकेसीएल’ला कंत्राट देण्याच्या निर्णयावर पांघरूण घालण्याचा केलेला हा प्रयत्न आहे, असा आरोप आमदार प्रवीण दटके यांनी केला.

हेही वाचा – Ravi Rana : “तुम्ही ‘सिल्वर ओक’वर लोटांगण घालू शकता किंवा ‘मातोश्री’वर…”; संजय राऊतांच्या ‘त्या’ टीकेला रवी राणांचं प्रतुत्तर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देण्याचा प्रकार

राज्यपाल व कुलपतींनी डॉ. चौधरी यांना ‘एमकेसीएल’ला अवैध प्रकारे काम दिल्याचा ठपका ठेवून निलंबित केले आहेत. या निर्णयाला डॉ. कल्पना पांडे एकप्रकारे आव्हानच देत आहेत. राज्यपालांच्या निर्णयावर बोट ठेवून डॉ. पांडे या कोणाचा बचाव करीत आहेत हे स्पष्ट आहे. परंतु, या सर्व लढ्यात विद्यार्थी आणि विद्यापीठाच्या हिताच्या बाजूने आम्ही उभे राहणार असून गरज पडल्यास कायदेशीर मार्गांचा अवलंब करू, असा इशारा विष्णू चांगदे यांनी दिला.