नागपूर : अंबाझरी तलावावर आंघोळ करताना एक युवक बुडायला लागला. तलावावर गस्तीवर असलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांचे लक्ष गेले. त्यांनी लगेच पाण्यात उड्या घेऊन त्या युवकाचे प्राण वाचविले. प्रवीण (रा.परभणी) असे त्या युवकाचे नाव आहे.
हेही वाचा – अकोल्यात काँग्रेस अडकली वादात
हेही वाचा – नागपूर : अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध राज्यांतील विविध जिल्ह्यांतील लाखो अनुयायी दीक्षाभूमीला येतात. काही अनुयायी अंबाझरी तलावावावर आंघोळीसाठी जातात. ही बाब लक्षात घेऊन राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान गस्तीवर ठेवण्यात येतात. सोमवारी प्रवीण काही मित्रांसह दीक्षाभूमीवर आला होता. दुपारी एक वाजता तो अंबाझरी तलावावर आंघोळीसाठी गेला. त्याला पोहता येत नव्हते. मात्र, मित्रांच्या आग्रहास्तव तो पाण्यात उतरला आणि काही वेळात बुडायला लागला. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांना प्रवीण बुडताना दिसला. त्यांनी लगेच पाण्यात उड्या घेऊन प्रवीणचा जीव वाचवला.