नवनिर्वाचित आमदार विकास ठाकरे यांचा सवाल; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट
केवळ भौतिक विकास म्हणजेच विकास नव्हे तर सामाजिक अंगाने देखील विकास होणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री नागपूरचे होते. त्यांनी मिहान प्रकल्प पूर्ण करायला हवा होते. मेट्रो रेल्वेनंतर आली असती तरी चालले असते. आता मेट्रो पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. परंतु रोजगार निर्मिती होऊ शकणारे मोठे उद्योगधंदे नाहीत त्यामुळे नोकऱ्या नाहीत. अशा स्थितीत मेट्रोतून प्रवास कोण करेल, असा सवाल नवनिर्वाचित आमदार व काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी केला.
आ. ठाकरे यांनी बुधवारी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मतदारसंघाच्या विकासाची संकल्पना मांडली. तसेच आमदार म्हणून येत्या पाच वर्षांत शिक्षण, आरोग्याचे प्रश्न सोडवण्याला दिले जाणारे प्राधान्य याबाबत माहिती दिली. आ. ठाकरे म्हणाले, पश्चिम नागपुरातील महापालिकेच्या शाळा एकेक करून बंद पडत आहेत. अनुदानित शाळांना देशभाल-दुरुस्तीसाठी निधी मिळत नसल्याने शाळांचा स्तर घरसला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल चांगल्या शाळा बांधून दर्जेदार शिक्षण देत आहेत. नागपूर महापालिकेच्या शाळेत असे शिक्षण का दिले जाऊ शकत नाही? यातील काही निवडक शाळांची इमारत दुरुस्ती करणे आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याला आपले प्रथम प्राधान्य राहणार आहे. त्यासाठी महापालिका किंवा राज्य सरकार यापैकी ज्यांची शक्य आहे त्यांची मदत घेतली जाईल. सर्वसामान्यांना दर्जेदार पण, परवडेल असे शिक्षण आणि आरोग्यविषयक सुविधा देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. पश्चिम नागपुरात आरोग्याच्या सुविधा देण्याचा प्रयत्न राहणार आहे. सध्या एकही सार्वजनिक रुग्णालय या भागात नाही. खासगी रुग्णालये अक्षरश: लूट करीत आहेत. शासकीय मनोरुग्णालयाच्या आवारात प्रस्तावित जिल्हा रुग्णालयाच्या कामाला गती यावी, यासाठी प्रयत्न करणार आहे. दोन वर्षांनी नागपूर महापालिकेच्या निवडणुका आहेत. येथे काँग्रेस सत्तेत आणण्यासाठी पक्ष संघटन मजबूत करण्यात येत आहे. नागपूर महापालिकेत सत्ताच येताच घर कर, पाण्याचे देयक कमी करण्यावर भर राहणार आहे.
सध्याच्या चार सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे प्रश्न सुटत नसल्याची लोकांची तक्रार आहे. यासंदर्भात सरकारने विचार करावा, यासाठी आपण आग्रही राहणार आहोत. एकीकडे चांगले डांबरी रस्ते खोदून सिमेंट रस्ते तयार केले जात आहेत. मात्र, दाभा, गोरेवाडा, झिंगाबाई टाकळी परिसरात रस्ते नाहीत. त्या भागात रस्ते तयार करण्यात येतील.
अर्धवट प्रकल्प पूर्ण करणार
मागील सरकारमध्ये नागपूरचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळात सुरू झालेली अनेक कामे अर्धवट आहेत. ही कामे पूर्ण करण्याची जबाबदारी आता आमची आहे. त्यासाठी निधी खेचून आणण्यासाठी लढाई लढावी लागणार आहे. याची कल्पना आहे. त्यासाठी माझी तयारी झाली आहे.
शाळा आणि रुग्णालये उभारणार
सिमेंट रस्ते म्हणजे विकास नव्हे. लोकप्रतिनिधी सर्वसमान्यांच्या कामी आला पाहिजे, असे मी निवडणूक प्रचारात सांगत होतो. त्यानुसार सर्वसामान्यांना भेडसावणारे आरोग्याचे आणि शिक्षणाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मतदारसंघात शाळा आणि रुग्णालये उभारण्यावर भर राहणार आहे.
काँग्रेस संपणारच नाही
काँग्रेस लोकांच्या मनात आहे. हा पक्ष संपणारच नाही. पक्षाने विधानसभेत नागपूर शहरात थोडी ताकद वाढवली असती तर आणखी दोन जागा मिळाल्या असत्या. काँग्रेसचे चार आणि भाजपचे दोन असे चित्रे असते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे त्यांच्याच शहरात पानिपत झाल्याचे दिसले असते.