राजेश्वर ठाकरे, लोकसत्ता

नागपूर : काँग्रेसने लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराची चौथी यादी जाहीर केली असून भंडारा-गोंदिया मतदारसंघातून डॉ. प्रशांत पडोळे यांनी उमेदवारी दिली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पक्षाने येथून लढण्याची सूचना केली होती. परंतु पटोले यांनी राज्याच्या राजकारणात रस असल्याचे सांगून उमेदवारी घेण्याचे टाळले. मात्र, विरोधकांनी पराभवाच्या भितीने पटोले यांनी लोकसभा लढण्याचे टाळले, अशी टीका केली आहे.

भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत कमीत कमी जागावर रोखण्यासाठी अधिक प्रभावशाली नेत्यांना उमेदवारी देण्याचे धोरण काँग्रेस अंगिकारल्याचे दिसून येते. त्याचाच एक भाग म्हणून भंडारा-गोंदिया येथून नाना पटोले यांना लढण्याची सूचना करण्यात आली होती. परंतु त्यांनी नकार दिला आणि आपले समर्थक डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी देण्याची मागणी पक्षाकडे केली. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी पटोले यांनी घेतली असल्याचे समजते. डॉ. प्रशांत पडोळे हे सहकारमहर्षी यादवराव पडोळे यांचे सुपुत्र आहेत. ते आयुर्वेदीक डॉक्टर असून त्यांनी जिल्ह्यात आरोग्यक्षेत्रात सेवेचे काम केले आहे. त्यांच्या पत्नी भंडारा जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत.

आणखी वाचा-“मी रडणार नाही, तर लढणार,” प्रतिभा धानोरकर यांचे शक्तिप्रदर्शन; उमेदवारी अर्ज दाखल

डॉ. पडोळे यांनी २०१४ मध्ये शिवसेनेकडून साकोली विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा दारुण पराभव झाला होता. या निवडणुकीत त्यांची अमानत रक्कम जप्त झाली होती. पटोले हे काँग्रेसमध्ये आल्यानंतर पडोळे त्यांच्या संपर्कात झाले. त्यांनी २०१९ ची निवडणूक लढवली नाही. या निवडणुकीत त्यांनी नाना पटोले यांचे काम केले. त्यातून त्यांची जवळीक वाढली आणि त्यामुळे थेट काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढण्याची संधी मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नाना पटोले यांनी चार दिवसांपूर्वी जिल्ह्यातील एका कार्यक्रमात बोलताना मला भंडारा-गोंदिया जिल्हापर्यंत मर्यादीत करू नका. मला संपूर्ण राज्यात प्रचार करायचा आहे आणि भाजपला पराभूत करायचे आहे, असे म्हटले होते. तेव्हाच ते लोकसभा निवडणूक लढणार नाही. हे स्पष्ट झाले होते. परंतु त्यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत अमानत रक्कम जप्त झालेल्या नेत्याच्या उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह का धरला असावा याचे कोडे पक्षातील नेत्यांनाच उमगले नाही. दरम्यान, विरोधकांनी नाना पटोले यांनी पराभवाच्या भितीने लोकसभा निवडणुकीतून पळ काढला, अशी टीका केली आहे.