नागपूर: तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या तेलुगु भाषिक राज्यांमध्ये ‘गो बॅक मारवाडी’ हा नारा सध्या जोरात गाजत आहे. या मोहिमेमुळे मारवाडी समाजात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या दोन्ही राज्यांमध्ये मोठ्या संख्येने मारवाडी व्यापारी व्यवसाय करतात. महाराष्ट्रात मुंबई, नागपूर, पुणे आदि शहरांमध्ये मारवाडी समाजाची मोठी लोकसंख्या आहे. मुंबईमध्ये अनेक वर्ष स्थानिकांना रोजगार देण्यावरून आंदोलने झाली आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील सर्वात उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हैदराबाद आणि रांगारेड्डी जिल्ह्यांमध्ये निदर्शने

या आंदोलनाचे केंद्रबिंदू हैदराबाद आणि रांगारेड्डी जिल्ह्यातील अमंगल हे ठिकाण आहे. स्थानिक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, राजस्थानमधील मारवाडी व्यापारी त्यांच्या भ्रामक व्यवसाय पद्धतींमुळे स्थानिक व्यवसायांना आणि छोट्या दुकानदारांना मोठे नुकसान पोहोचवत आहेत.

आरोप आणि मागण्या

आंदोलकांनी मारवाडी व्यापाऱ्यांवर स्थानिक संसाधनांचा गैरवापर आणि नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना संधी न देण्याचा आरोप केला आहे. तेलंगणा क्रांती दलाचे अध्यक्ष संगमरेड्डी प्रितिविराज यांनी गुजराती आणि राजस्थानी व्यापाऱ्यांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सरकारकडे ५ लाखांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ठिकाणी बाहेरील लोकांना व्यवसाय सुरू करण्यापासून थांबवण्याची मागणी केली आहे.

संघर्षाची सुरुवात

अमंगल येथील एका पार्किंग वादातून या संघर्षाला सुरुवात झाली, जिथे एका मारवाडी ज्वेलर्सने एका स्थानिक व्यक्तीवर हल्ला केला होता. या घटनेनंतर या आंदोलनाला स्थानिकांचा मोठा पाठिंबा मिळाला. तसेच, काही आंदोलकांनी मारवाडी व्यापाऱ्यांकडून सण-उत्सवांचे व्यापारीकरण होत असल्याचा आणि यामुळे तेलंगणाच्या संस्कृतीला धोका निर्माण होत असल्याचा आरोपही केला आहे. या सर्व परिस्थितीमुळे, तेलंगणा सरकारसमोर आता या वादावर नियंत्रण मिळवण्याचे आणि स्थानिक व्यापाऱ्यांचे हित जपण्याचे मोठे आव्हान आहे.

काय आहे वाद?

सिकंदराबादच्या मोंडा मार्केटमध्ये एका मारवाडी व्यापाऱ्याने एका व्यक्तीवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेची निंदा करत ओस्मानिया विद्यापीठाच्या जॉइंट अॅक्शन कमिटीचे अध्यक्ष कोथापल्ली तिरुपती यांनी २२ ऑगस्ट रोजी तेलंगणा बंदचे आवाहन केले होते. या बंदला तेलंगणाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये प्रतिसाद मिळाला. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याच दरम्यान, कोथापल्ली तिरुपती यांना पोलिसांनी ओस्मानिया विद्यापीठाच्या वसतिगृहातून ताब्यात घेतले आणि नंतर त्यांना नल्लाकुंटा पोलीस स्टेशनला हलवण्यात आले. कोथापल्ली तिरुपती यांनीच ‘गो बॅक मारवाडी, ‘गो बॅक गुजराती-राजस्थान’ मोहीम सुरु केली होती. ही मोहीम आता आंध्र प्रदेशातही पसरली आहे.