नागपूर : हजारो लोकांच्या गर्दीतून एखाद्या व्यक्तीला त्याच्या नावासह बोलवायचे, त्याला न विचारता त्यांच्या सर्व अडचणींचा पाढा वाचून तो सोडवण्याचा दावा करायचा, महिलांना भूतबाधा झाल्याचे सांगत त्यातून सुटका करण्याचा व जाहीरपणे चमत्काराचा दावा करणाऱ्या धीरेंद्र कृष्ण महाराज ऊर्फ बागेश्वर बाबांवर अंधश्रद्धा व जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाई का करण्यात आली नाही, असा सवाल विज्ञानप्रेमी व अंनिसच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धीरेंद्र कृष्ण महाराज यांच्या श्रीराम कथेचे ५ ते १३ जानेवारीदरम्यान रेशीमबाग मैदानात आयोजन करण्यात आले होते. ७ व ८ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रात दिव्य दरबार पार पडला. नियोजनानुसार, १३ जानेवारी रोजी यज्ञ पूर्णाहुती होणार होती. मात्र, त्यापूर्वीच समारोप करण्यात आला. बाबांच्या दरबारामुळे ही रामकथा नागपुरात चर्चेचा विषय ठरली आहे.

हेही वाचा >>>> धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचे संत तुकाराम महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान; म्हणाले “त्यांची पत्नी…”

ज्या काळात नागपुरात विद्यापीठात सायन्स काँग्रेस सुरू होते, त्याच काळात रेशीमबागमध्ये बागेश्वर महाराजाचा दरबार सुरू होता. या दरबारात लाखाच्या जवळ स्त्री-पुरुष तासनतास हजेरी लावत असे. दरबाराचे स्वरूप एका बाजूला ‘रामकथा’ आणि दुसरीकडे ‘दिव्य दरबार’अ्से होते. रामकथेला कुणाचा विरोध नाही, हे ओळखून बाबा त्याचा ‘दिव्य दरबार’ भरवत होता. यात बाबा लोकांच्या तब्येतीच्या , प्रेमसंबंधातील, कौटुंबिक, आर्थिक समस्या सोडवण्याचा दावा करीत होता. एखाद्या भक्त महिलेला मंचावर बोलावून तो तिचे नाव व समस्या आपल्या अंतर्ज्ञानाने सांगण्याचा दावा करीत होता. हा एकप्रकारे अंधश्रद्धेचाच प्रकार होता.

हेही वाचा >>>> नागपूर : अरे बापरे! गुप्तांगामध्ये लपवून आणले तब्बल सव्वा किलो सोने अन्…

विशेष म्हणजे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच येथे अंधश्रद्धेला खतपाणी घातले जाईल ही शक्यता लक्षात घेऊन हा प्रकार थांबवा, असा विनंती अर्ज संबंधित पोलीस ठाण्यात दिला होता. मात्र त्यानंतरही सुरुवातीला बाबांनी दरबार भरवलाच व तेथे अनेक चमत्काराचे दावे केले. हा अंधश्रद्धा व जादूटोणा विरोधी कायद्याचा भंग असल्याचे मत अनेक विज्ञानप्रेमींनी व्यक्त केले आहे. अनेकांनी त्यांच्या भावना बाबांचे व्हिडीयो समाजमाध्यमांवर टाकून या प्रकाराचा निषेध केला.

हेही वाचा >>>> धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांचा नवा दावा; म्हणाले, “माईंड रीडर सुहानी शाह यांच्यापेक्षा मी करतो ते वेगळं आहे, कारण…”!

नागपूरमध्ये यापूर्वी अनेक भोंदूबाबांचा पर्दाफाश करण्यात आला आहे. अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने १९९० च्या दशकात अशा अनेक बाबांना नागपुरातून पळवून लावले आहे. चमत्कार सिद्ध करा व लाखोंचे बक्षीस मिळवा हे अंनिसचे आव्हान एकाही बाबाने आतापर्यंत स्वीकारले नाही. धीरेंद्र कृष्ण महाराजाला अंनिसने आव्हान दिले पण ते स्वीकारण्यापूर्वीच त्यांनी गाशा गुंडाळला. मात्र, तक्रार करूनही पोलिसांनी त्याच्यावर कारवाई का केली नाही, असा सवाल आता केला जात आहे.

यंत्रणा का हलली नाही?

महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा आहे आणि बाबा करीत असलेले चमत्काराचे प्रकार हे त्या कायद्याचा भंग करणारे आहे. पोलीस यंत्रणेने स्वतःहून बागेश्वर बाबा विरुद्ध कारवाई करणे अपेक्षित असल्याचे अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी सांगितले. मात्र, त्यानंतरही प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why there is no action against bageshwar baba who claims miracles superstition eradication committee cwb 76 ysh
First published on: 12-01-2023 at 09:58 IST