नागपूर : पूर्व विदर्भात डेंग्यू व हिवतापाने डोके वर काढले आहे. येथे १ जानेवारी ते १४ जुलैदरम्यान डेंग्यूचे ७५ नवीन रुग्ण आढळले. तर हिवतापाचेही १ जानेवारी २०२२ ते २१ जुलै २०२२ पर्यंत २ हजार १४ रुग्ण नोंदवले गेले. डेंग्यूच्या एकूण रुग्णांपैकी ४१ रुग्ण गेल्या १४ दिवसांतील आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयातील नोंदीनुसार, पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा या सहा जिल्ह्यांत १ जानेवारी ते १४ जुलै दरम्यान डेंग्यूचे ७५ रुग्ण आढळले. त्यातील ४१ रुग्ण हे १ जुलै ते १४ जुलै दरम्यानचे आहेत. एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक ४० रुग्ण गोंदिया, २१ रुग्ण नागपूर जिल्ह्यातील आहेत. वर्धा जिल्ह्यात ६, भंडारा २, चंद्रपूर ४, गडचिरोलीत २ रुग्णांची नोंद झाली. १ जानेवारी २०२२ ते २१ जुलै २०२२ दरम्यान पूर्व विदर्भात हिवतापाचे २ हजार १४ रुग्ण आढळले. पूर्व विदर्भात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक भागांत डास वाढले आहेत. त्यामुळेही विविध आजार वाढण्याचा धोका आहे. परंतु सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सर्वत्र नियमित कीटकनाशक फवारणी केली जात असल्याचा दावा होत आहे. दरम्यान, हिवतापाच्या एकूण रुग्णांत सर्वाधिक १ हजार ८६६ रुग्णांची नोंद गडचिरोलीत झाली. त्यानंतर १३१ रुग्ण गोंदिया, १४ रुग्ण चंद्रपूर, ३ रुग्ण भंडारा जिल्ह्यात नोंदवण्यात आले. परंतु, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात एकाही रुग्णाची नोंद नाही. त्यामुळे येथील आरोग्य विभागाच्या कामावर वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार प्रश्न उपस्थित करत आहेत.
हिवतापाची स्थिती (१ जानेवारी ते २१ जुलै २०२२)
जिल्हा रुग्ण
गडचिरोली १८६६
चंद्रपूर १४
गोंदिया १३१
जिल्हा रुग्ण
भंडारा ३
नागपूर ०
वर्धा ०
डेंग्यूची स्थिती (१ जानेवारी ते १४ जुलै २०२२)
जिल्हा रुग्ण
गडचिरोली ०२
चंद्रपूर ०४
गोंदिया ४०
जिल्हा रुग्ण
भंडारा ०२
नागपूर २१
वर्धा ०६
