अमरावती : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील दहीगाव शेतशिवारात शेतात मजुरीस आलेली महिला वीज खांबावरील खाली तुटून पडलेल्या तारेतून जिवंत वीज प्रवाहाच्या संपर्कात आल्याने जागीच मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी घडली. महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप करीत शेकडो गावकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयात महिलेचा मृतदेह आणला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
रुपाली शुध्दोधन सावळे (३१, रा. दहीगाव रेचा) असे मृत महिलेचे नाव आहे. अरूण टकोरे यांच्या दहीगाव रेचा येथील शेतात त्या इतर काही महिलांसह कामासाठी गेल्या होत्या. रुपाली शुद्दोधन सावळे यांचा शेतशिवारातील विजेच्या तुटून पडलेल्या तारेतून जिवंत विद्युत प्रवाहाशी संपर्क आला आणि त्यांचा घटना स्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावकऱ्यांना कळताच जमाव एकत्र झाला. या घटनेसाठी महावितरण कंपनी जबाबदार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला.
मृत महिलेचे नातेवाईक आणि दहीगाव येथील गावकरी मृतदेह घेऊन येथील महावितरण कार्यालयावर धडकले. संबंधित अभियंता आणि कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन अटक व मोबदल्याची मागणी गावकऱ्यांनी केली . पथ्रोट, रहीमापूर येथील पोलिसांना पाचारण करण्यात आले. आमदार गजानन लवटे, शशीकांत मगळे, शंकर मालठाणे,रमेश सावळे, बाळा शेरकर, बाळु रोंघे, शंभू मालठाने यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले.
जबाबदार कर्मचाऱ्यांवर कारवाई आणि महावितरण कार्यलयाद्वारे शासन निर्मित नियम व अटीचे आधारे मदत दिली जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. वीस हजार रुपयांचा धनादेश व आमदार लवटे यांनी स्वतःकडून वीस हजार रुपये अशी चाळीस हजार रुपयाची तत्काळ मदत नातेवाईकांना देण्यात आली तसेच आर्थिक मोबदला मिळण्यासाठी महा वितरण कंपनी तातडीने या कार्यालयातून प्रस्ताव कार्यकारी अभियंता, अचलपूर येथे पाठविण्यात येत असल्याचे व मोबादला मिळेपर्यंत पाठपुरावा करण्याचे तसेच ज्यांची चूक असेल त्यांच्यावर गंभीर स्वरुपाची कारवाही करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर जमाव शांत झाला व नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. नंतर शवविच्छेदन करण्यात आले.
संबंधित कर्मचारी यांच्यावर गुन्हे नोंदविण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. रुपाली सावळे यांच्या मृत्यूने तिची दोन्ही मुले पोरकी झाली असून दहीगांव रेचा गावात व परीसरात शोककळा पसरली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी महावितरण कार्यालय व ग्रामीण रुग्णालयात चोख बंदोबस्त ठेवला होता.