नागपूर : आज माणूस आणि कुटुंबातला संवाद संपला आहे. माणसासाठी माणूस महाग झाला आहे. आम्हाला नवी पिढी घडवताना छत्रपती शिवाजी महाराज शेजारच्या घरात घडावा, असे वाटते. मात्र, आता प्रत्येक स्त्रीने स्वत: जिजामाता बनून घराघरात शिवाजी घडवण्याचा संकल्प करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कांचन गडकरी यांनी केले.
भारत विकास परिषदेतर्फे भारत विकास परिषद, नागपूर स्मार्ट सिटी शाखेची स्थापना करण्यात आली. या शाखेच्या उद्घाटन आणि कार्यकारिणी पदग्रहण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून कांचन गडकरी बोलत होत्या. यावेळी चंद्रशेखर घुशे, माजी महापौर दयाशंकर तिवारी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. भारतीय समाजव्यवस्थेत स्त्रीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. स्त्रीने योग्य संस्कार केले तरच सुसंस्कृत युवा पिढी घडू शकते. स्त्रीशिवाय पुरुष अपूर्ण आहे. त्यामुळेच आमच्या संस्कृतीत पुरुषाच्या आधी स्त्रीचे नाव जोडले जाते. स्त्रीने ठरवले तर ती परिवर्तन घडवू शकते यासाठी तिला प्रेरणा देणे गरजेचे आहे. तिला आत्मसन्मानही मिळायला हवा, अशी अपेक्षा कांचन गडकरी यांनी व्यक्त केली.




आज समाजात वाईट गोष्टींची संख्या वाढली आहे. प्रत्येक माणसात सूर म्हणजेच देव आणि असूर म्हणजेच दानव दडलेला आहे. समाजातील वाढत्या असूरशक्तीला संपवून देवत्व जपणारा समाज घडवण्यासाठी भारत विकास परिषदेसारख्या संघटनांची गरज आहे, असे मत माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केले. विदर्भ प्रांत कार्यकारिणी सदस्य अविनाश पाठक यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. अंजली वडोदकर यांनी केले.