यवतमाळ : रास्त भाव धान्य दुकानाच्या प्राधिकार पत्रावर वारस म्हणून नाव चढविण्यासाठी वीस हजार रुपयांतील १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना महिला पुरवठा निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकली. चांदणी शेषराव शिवरकर (३२) असे लाचखोर महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळी येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात करण्यात आली.
हेही वाचा >>> नागपूर: सहा वर्षांसाठी काँग्रेसमधून निष्कासित माजी आमदार आशिष देशमुख म्हणतात, की मला पक्षातून काढण्याचे आधीच…
यवतमाळ तालुक्यातील तक्रारदाराने स्वतःच्या वडिलांच्या नावे असलेले रास्तभाव धान्य दुकानाच्या प्राधिकार पत्रावर नावाची नोंद घेण्यासाठी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात अहवाल सादर केला होता. हा अहवाल अनेक दिवसांपर्यंत लिपिकाच्या टेबलवर पडून होता. त्यानंतर सदर अहवाल निरीक्षण अधिकारी चांदणी शिवरकर यांच्याकडे पाठविण्यात आला. शिवरकर यांनी तक्रारदारास प्राधिकार पत्रावर वारस म्हणून नाव चढविण्यासाठी २० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यातील १० हजार रुपये तक्रारदाराने आधीच दिले. उर्वरित १० हजार रुपये देण्यापूर्वी त्यांनी अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. २४ मे रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाहीअंतर्गत लोकसेवक चांदणी शिवरकर निरीक्षण अधिकारी तहसील कार्यालय यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली तसेच १० हजार रुपये रक्कम त्यांच्या कक्षामध्ये स्वीकारण्यात आल्यानंतर ती ताब्यात घेण्यात आली. याप्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई अमरावती आणि यवतमाळ लाच लुचपत विभागाच्या वतीने करण्यात आली.