लोकसत्‍ता टीम

अमरावती : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून साडीने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव रचला. ही धक्कादायक घटना ब्राम्‍हणवाडा थडी पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील विश्रोळी येथे उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र पारणाजी इंगळे (५३) रा. विश्रोळी असे मृताचे नाव आहे. तर सुनीता रवींद्र इंगळे (३४) व तिचा प्रियकर अतुल शंकर लहाने (३१) दोघेही रा. विश्रोळी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. रवींद्र हे पत्नी सुनीता व मुलींसह विश्रोळी येथे वास्तव्यास होते. पत्नी सुनीता हिचे गावातीलच रहिवासी अतुल याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचे रवींद्र यांना कळले होते. या कारणावरून रवींद्र व त्यांची पत्नी सुनीता यांच्यात नेहमीच वाद होत होते. गुरुवारी रात्रीसुद्धा याच कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद उद्भवला. यावेळी सुनीताने प्रियकर अतुलला घरी बोलाविले. त्यानंतर दोघांनी साडीने रवींद्र यांचा गळा आवळून त्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांनी रवींद्र यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव रचला.

आणखी वाचा-वर्धा : अनैतिक संबंधास विरोध; मुलाने आईच्या डोक्यात घातला वरवंटा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सदर घटनेनंतर रवींद्र यांच्या मुलीने रडत रडत रवींद्र यांचे मोठे भाऊ सिद्धार्थ पारनाजी इंगळे (५५) यांच्याकडे जाऊन याबाबत माहिती दिली. त्यानुसार सिद्धार्थ यांनी तातडीने रवींद्र यांचे घर गाठून त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर घटनेची माहिती ब्राह्मणवाडा थडी पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच ठाणेदार उल्हास राठोड यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी सिद्धार्थ यांनी ब्राह्मणवाडा पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी पत्नी सुनीता व तिचा प्रियकर अतुल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले. पुढील तपास ठाणेदार उल्हास राठोड करीत आहेत.