यवतमाळ : गेला दीड महिना ऊन – पावसाचा खेळ चालल्यानंतर जिल्ह्यात सध्या ‘नवतपा’चा असह्य उकाडा सुरू आहे. शनिवारी या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४५.५ तापमानाची नोंद झाली असून, या उकाड्याने ३५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. यापूर्वी १७ मे १९८९ रोजी जिल्ह्यातील तापमानाचा पारा ४६.६ वर गेला होता. तापमान वाढल्याने सध्या जिल्ह्यात अघोषित संचारबंदी सदृश स्थिती आहे.

शनिवारी जिल्ह्यात ४५.५ एवढ्या विक्रमी तापमानाची नोंद झाली. यंदाच्या उन्हाळ्यातील हे सर्वोच्च तापमान ठरले. विशेष म्हणजे २०१९ नंतर पहिल्यांदाच पारा ४५.५ वर पोहोचला होता. गेल्या काही वर्षांपासून तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या दोन वर्षांत एप्रिल महिन्यात अवकाळी वतावरण राहत असल्याने उन्हाची तीव्रता फार जाणवत नव्हती. यावर्षीसुद्धा अवकाळीने जोर काढला. मात्र मे महिन्याच्या दुसऱ्या, तिसऱ्या आठवड्यात उनही तापायला लागले. गेल्या तीन दिवसांत यवतमाळचा पारा ४३ अंशाच्या पुढे सरकला. शुक्रवारी ४५ अंशापर्यंत पोहोचलेले तापमान शनिवारी ४५.५ अंशावर गेले. आज रविवारीही सकाळपासून सूर्य आग ओकत आहे. वाढत्या तापमानामुळे सकाळी ११ वाजतानंतर रस्ते ओस पडत आहे. सायंकाळपर्यंत रस्त्यांवर शुकशुकाट असतो.

हेही वाचा – स्मार्ट प्रीपेड मीटर योजनेला कडाडून विरोध! नागपुरात विविध संघटना व पक्षांची बैठक

तापमान वाढल्याने पाण्याची पातळीसुद्धा घटली आहे. त्यातच वीज वारंवार खंडीत होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत नसल्याने त्याचा परिणाम पाणीपुरवठा, कुलरचा वापर यावर झाला आहे. दरम्यान सध्या विवाहाचे मुहूर्त नसल्याने नागरिकांना बराच दिलासा मिळत आहे.

हेही वाचा – राज्यात हिवतापामुळे तिघांचा मृत्यू, बृहन्मुंबईसह ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण

उष्माघाताचे रुग्ण वाढण्याची शक्यता

जिल्ह्यात तापमान वाढल्याने उष्माघाताचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर काम करत आहेत. उन्हाची तीव्रता लक्षात घेता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय एक, उपजिल्हा रुग्णालयात तीन, तालुका रुग्णालयात १४ तर प्राथमिक आरोग्य केंद्रात ६६ असे एकूण ८४ शीत कक्ष सुरू करण्यात आले आहेत. या ठिकाणी उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी २४७ खाटा राखीव आहेत. नागरिकांनी दुपारी १२ वाजतानंतर बाहेर पडू नये. सायंकाळी उन्हाचा पारा कमी झाल्यावर घराबाहेर पडावे, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, लहान मुले आजारी लोकांनी उन्हात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पुढील तीन, चार दिवस तापमान असेच वाढते राहण्याची शक्यता आहे.