यवतमाळ : शासनाकडून भरमसाठ पगार घेऊनही वरकमाईचा हव्यास सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे नियमाने वागणाऱ्यालाही लाच मागणे चार महसूल अधिकाऱ्यांच्या चांगलेच अंगलट आले. यवतमाळच्या लाचलुचपत विभागाने कारवाई करून एक मंडळ अधिकारी, तीन ग्राम महसूल अधिकारी आणि त्यांच्यासाठी लाच घेणारा मजूर, अशा पाच जणांना ताब्यात घेतल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

मरूमाची कायदेशी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून तो सोडण्यासाठी ४० हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून सात हजार ५०० रूपयांची लाच स्वीकारताना महसूल विभागातील चार कर्मयाऱ्यांसह एका मजुरास रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी दारव्हा मार्गावरील बागवाडी बसथांब्याजवळ केली. जितेंद्र पांडूरंग ठाकरे (५७) मंडळ अधिकारी, महागाव कसबा, रा. नातूवाडी, दारव्हा, जय गणेश सोनोने (२६) ग्राम महसूल अधिकारी, हरू, रा. बापूजी नगर दारव्हा, पवन तानसेन भितकर (३०) ग्राम महसूल अधिकारी, पाळोदी, रा. अंबिका नगर, दारव्हा, नीलेश भास्कर तलवारे (३०), ग्राम महसूल अधिकारी, हातणी, रा. इंदिरा नगर, लाडखेड आणि अशोक श्रावण रणखांम (६०) मजूर, रा. हरू, ता. दारव्हा अशी लाच स्वीकारणाऱ्या आरोपींची नावे आहेत. तक्रारदाराचा मुरूम वाहतुकीचा व्यवसाय आहे.

२१ जुलै रोजी मुरूमाची वाहतूक करत असताना ट्रॅक्टर पंचर झाल्याने तो रस्त्याच्या कडेला उभा होता. या मार्गाने जात असलेल्या उपरोक्त कर्मचाऱ्यांनी कारवाई न करण्यासाठी तक्रारदारास ४० हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. मरूम वाहतुकीच्या नियमानुसार सर्व पावत्या असल्याने कारवाई न करण्याची विनंती करूनही या कर्मचाऱ्यांनी तक्रारदाराकडून त्याच दिवशी १७ हजार रूपये नगदी घेवून ट्रॅक्टर जप्त केला. तो सोडविण्यासाठी उर्वरित २३ हजार रूपये देण्याची मागणी केली. यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ येथे तक्रार दाखल केली. लाचलुचपत विभागाने तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्वरित २३ हजार रूपयांपैकी सात हजार ५०० रूपयांचा पहिला हप्ता घेण्यास कर्मचारी तयार झाले. त्यानुसार आरोपींपैकी मजूर असलेल्या खासगी व्यक्तीने गुरूवारी बागवाडी बसथांब्याजवळ ही रक्कम स्वीकारली. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धाड टाकून आरोपींना रंगेहात पकडले व कायदेशीर कारवाईकरीता ताब्यात घेतले. या प्रकरणी दारव्हा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अर्जून धनवट यांच्यासह पोलीस निरीक्षक मनोज ओरके, अतूल मते, अब्दूल वसीम, राकेश सावसाकडे, गोवर्धन वाढई, भागवत पाटील, सूरज मेश्राम, अतूल नागमोते यांनी केली.