यवतमाळ : गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजनेतील अनेक त्रुटी आता पुढे येत आहे. या योजनेच्या माध्यमातून करदात्या, नोकरदार बहिणींसह लाडक्या भावांनीही धूळफेक करत योजना लाटल्याचे पुढे आले. यवतमाळ जिल्ह्यातील वयाच्या निकषात न बसणाऱ्या व एकाच घरात दोन पेक्षा अधिक लाभार्थी असल्यास अशा बहिणींची गृह चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत बँक खाती गोठविण्यात आली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ मिळावा म्हणून जिल्हाभरातून सात लाख १९ हजार ८८० अर्ज दाखल झाले. मात्र अनेकांनी योजनेचा गैरफायदा घेतल्याचे पुढे आल्याने, आता संशयित अर्जांची छाननी करून चौकशी करण्यात येत आहे. अशा लाभार्थ्यांची गृह चौकशी हाती घेण्यात आली असून यात जिल्ह्यातील ४९ हजार ७३५ लाडक्या बहिणीचां समावेश आहे. या लाभार्थ्यांच्या खात्यातील व्यवहार आता चौकशी होईपर्यंत थंबविण्यात आल्याने लाडक्या बहिणी कारवाईच्या भीतीने धास्तावल्या आहेत.

जिल्ह्यात सहा लाख ९२ हजार ५६३ बहिणींचे अर्ज या योजनेसाठी पात्र ठरले होते. आलेल्या अर्जांपैकी २७ हजार ३१७ अर्ज बाद झाले होते. तरीही योजनेचा अनेक अपात्र लाभार्थ्यांनी लाभ घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात मासिक दीड हजार रुपयांप्रमाणे १२ हप्ते जमा झाले आहेत. या कालावधीत महिला बालकल्याण विभाग आणि इतर ठिकाणी लाभार्थ्याच्या वयासंदर्भात तक्रारी दाखल झाल्या. आयटी विभागातील कागदपत्रांच्या तपासणीमधून काही महिला लाभार्थी अपात्र ठरल्या आहेत.

महिला व बालकल्याण विभागाचे राज्याचे सचिव अनुप कुमार यांनी अशा लाभार्थ्यांची चौकशी करण्याच्या सूचना या विभागास दिल्या आहेत. विशेष म्हणजे ही जबाबदारी अंगणवाडी ताईंकडे देण्यात आली आहे. येत्या १० ते १५ दिवसांत ही चौकशी पूर्ण करावी लागणार आहे. ज्या महिलांचे वय कमी आहे किंवा अधिक आहे, त्यांना जन्म दाखला, अथवा टीसी असा दस्तऐवज द्यावा लागणार आहे. विशेष म्हणजे उपप्रादेशिक विभागाकडून वाहनधारक महिलांची यादी मागविण्यात आली. ज्या लाभार्थ्यांच्या नावे दुचाकी, चारचाकी असेल तर त्या लाभार्थ्यांना योजनेतून वगळले जाणार आहे. याशिवाय निराधार, शेतकरी मदत, या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनाही वगळले जात आहे. तसेच काही महिलांनी मदत नाकारली आहे. योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी होत आहे.

खाती गोठविली

जिल्ह्यातील ४९ हजार लाडक्या बहिणींची गृह चौकशी सुरू झाली आहे. तोपर्यत त्यांच्या मदतीचे खाते गोठविण्यात आले आहे. या चौकशीनंतर एकाच घरात दोन पेक्षा अधिक लाभार्थी असलेले आणि २१ वर्षाखालील आणि ६५ वर्षावरील महिला लाभार्थीना योजनेतून वगळले जाणार आहे, असे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांनी सांगितले.