यवतमाळ : जिल्ह्यात नगरपालिकांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने राजकारण तापले आहे. जवळपास नऊ वर्षांनंतर ही निवडणूक होत असल्याने आखाड्यात उतरण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. तीन वर्षापूर्वी कालावधी संपल्यानंतर नगरपालिकांवर प्रशासक विराजमान झाले. तेव्हाचे सत्ताधारी आणि विरोधक आता एकमेकांचे उणेदुणे काढत असून, या भांडणात सर्वच शहरांमध्ये मतदारांचे प्रश्न मात्र हरवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत, यापूर्वी सत्तेवर असलेली मंडळी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासाचे दावे करीत आहेत. दुसरीकडे, गेल्या पाच वर्षांपासून विरोधी बाकावर बसलेल्या गटाने सत्ताधाऱ्यांच्या दाव्यांना थेट आव्हान देत, ‘कुठेय विकास,’ असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असताना, खरा ‘मतदार राजा’ मात्र मूलभूत समस्यांच्या गर्तेत अडकला असून, त्याच्या मुद्द्याला कुणीच हात घालत नसल्याने राजकारणात रसच राहिला नसल्याचे मत सर्वसामान्यांतून पुढे येत आहे.

मतदारांच्या तोंडी सद्यःस्थितीत सर्वाधिक चर्चा असलेले प्रश्न म्हणजे, रस्ते, पाणी आणि स्वच्छता हे आहेत. केंद्राची अमृत पाणी पुरवठा योजना सुरू होवूनही नागरिकांना आजही नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. पाणीप्रश्न बुहुतांश पालिकांमध्ये गंभीर आहे. आठवड्याला एकदाच नळाला पाणी येते. दररोज पाणी देण्याचे आश्वासन देणारेही आता त्याबाबत बोलत नसल्याचे चित्र आहे. तसेच प्रत्येक शहरात अस्वच्छतेमुळे निर्माण होणाऱ्या समस्या मतदारांच्या नाराजीचे कारण ठरत आहेत. निवडणुकीत राजकीय पक्षांचे दावे आणि प्रतिदावे सुरू असले तरी, सामान्य मतदारांचे हे ज्वलंत प्रश्न मात्र निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहिल्याचे दिसत नाही.

स्वच्छतेचा प्रश्नही सर्वत्र कायम आहे. यवतमाळसह सर्वच शहरांमध्ये शहर सफाईचे कंत्राट दिले आहे. मात्र सफाई कामगार, कचरा गाड्यांचे चालक, त्यावरील कामगारांना नियमित वेतन मिळत नसल्याने शहरे बकाल झाली आहेत. यवतमाळ शहरात भूमिगट गटार योजनेसाठी सर्वत्र रस्ते फोडून पाईपलाईन टाकून वर्ष लोटले. मात्र अद्यापही नव्याने रस्त्यांची बांधणी किंवा डागडूजी करण्यात आली नाही. त्याचा फटका यावेळी निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या सत्ताधारी गटाच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे.

एकाही पक्षाने दिला नाही अद्याप जाहीरनामा !

महायुती असो की महाविकास आघाडी यातील एकाही पक्षाने अद्याप त्यांचा जाहीरनामा समोर आणला नाही. फक्त उमेदवारी मागणाऱ्यांच्या भाऊगर्दीत आपल्या पक्षात बंडखोरी होणार नाही, याचीच काळजी घेतली जात आहे. बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारीबाबत गोपनियता पाळली जात असून इच्छुकांना अर्ज सादर करण्याच्या सूचना पक्षाने दिल्या आहेत. मात्र ऐनवेळी ज्याला ‘एबी फॉर्म’ मिळेल, तोच पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात कायम राहणार आहे.