यवतमाळ : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसाने मंगळवारी रात्रीपासून रौद्ररूप धारण केले. आज बुधवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात १८ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात मंगळवारी रात्री ८ वाजतापासून जोरदार पावसास सुरुवात झाली. मध्यरात्रीपासून ते आज सकाळी १० वाजेपर्यंत सरासरी ३३.६० मिमी इतका पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. यामध्ये पांढरकवडा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. तर, बाभुळगाव, वणी, मारेगाव, केळापूर, राळेगाव तालुक्यातील १८ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
घारफळ, वणी, राजूर, कायर, रासा, गणेशपूर, मारेगाव, मार्डी, कुंभा, वानोजा, जळका बु., करंजी, झाडगाव, धानोरा, वाढोणा बाजार, वडकी, वरध, किन्ही जवादे या मंडळात अतिवृष्टी झाली. या मंडळात नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. केळापूर तालुक्यातील सायखेड़ा प्रकल्प १०० टक्के भरल्यामुळे धरणातून विसर्गास सुरुवात करण्यात आली आहे. अतिवृष्टी आणि धरण विसर्गामुळे संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही जीवित हानी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
झरी जामनी तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. त्यामूळे मांडवी – खूनी नदीच्या पुलावरुन पाणी वाहत आहे. त्यामुळे पांढरकवडा-बोरी-आदिलाबाद मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून ती इतरत्र वळविण्यात आली आहे. या ठिकाणी महसूल विभागाच्या मार्गदर्शनात पोलीस पाटील, सरपंच, कोतवाल आदी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.
यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणारे निळोणा, चापडोह धरणाच्या लाभक्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने या धरणांमध्येही पाणीसाठा अपत्याचे वाढत आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाने केले आहे. पूर परिस्थिती उद्भवल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्कात राहावे, असे निर्देश दिले आहेत. कोणत्याही आपत्तीची स्थिती उद्भवल्यास त्वरित मदतीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने कळविले आहे.
सायखेडा धरण ओव्हरफ्लो झाल्याने येळाबारा येथील धबधब्यावर पर्यटक दाखल होत आहे. यासोबत निळोणा, बेंबळा आदी जलाशयावर नागरिक पावसाळी पर्यटनासाठी येत आहे. यवतमाळजवळील निळोणा धरण हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. अनेक हौशी पर्यटक येथे फिरण्यासाठी आणि फोटोसाठी येत असतात. मात्र, याच ठिकाणी मध्यंतरीच्या काळात अनेकांचा पाण्यात बुडू. मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तरुण मंडळी पोहण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतरत असल्याने गंभीर घटना घडू शकतात. काही वेळा ही धाडसाची मजा जीवावर बेतू शकते. त्यामुळे प्रशासनाने धरण क्षेत्रांत तातडीने योग्य सुरक्षा उपाययोजना करावी, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे.