आफ्रिकन देशात जाणाऱ्या भारतीयांना पिवळ्या तापाची लागण होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक लस घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातूनही प्रत्येक वर्षी या देशात मोठय़ा प्रमाणावर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या बघता शासनाने दीड वर्षांपूर्वी नागपूरसह औरंगाबाद व मुंबईच्या जे जे रुग्णालयात हे लसीकरण केंद्र सुरू करण्याची घोषणा करून तेथील प्रत्येकी तीन डॉक्टरांना प्रशिक्षण दिले होते. अद्याप नागपुरातील या केंद्राचा पत्ता नसून येथील प्रशिक्षण घेतलेल्या एका डॉक्टरचीही बदली झाली आहे. तेव्हा शासनाच्या कामावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आफ्रिकन देशात मोठय़ा प्रमाणावर पिवळा ताप हा गंभीर आजार आढळतो. या रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या इतरही नागरिकांना मोठय़ा प्रमाणावर पिवळ्या तापाची लागण होण्याची शक्यता असते. तेव्हा आफ्रिकन देशात जाणाऱ्या प्रत्येक विदेशी पर्यटकांना या आजारापासून वाचण्याकरिता पिवळ्या तापाची प्रतिबंधात्मक लस देणे अत्यावश्यक आहे. या लसीमुळे संबंधित पर्यटक आफ्रिकन देशातून परत त्यांच्या देशात गेल्यास तेथे हा आजार पसरत नाही. पिवळ्या तापाचे गांभीर्य बघत जागतिक आरोग्य संस्थेच्या निकषानुसार प्रत्येक प्रवाशाला आफ्रिकन देशात जाण्यासाठी पिवळ्या तापाची प्रतिबंधात्मक लस द्यावी लागते. ही लस घेतल्याचे अधिकृत प्रमाणपत्र प्रवाशाने जोडल्याशिवाय या प्रवाशाला त्या देशात जाण्याचा व्हिजाही मिळत नाही.
आफ्रिकन देशात व्यवसाय, नोकरीसह पर्यटन व विविध कामाकरिता प्रत्येक वर्षी भारताच्या वेगवेगळ्या भागासह विदर्भातून मोठय़ा संख्येने नागरिक जातात.
या प्रवाशांना लसीकरणासाठी अडचण येऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने दीड वर्षांपूर्वी मुंबई, औरंगाबादसह नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे केंद्र स्थापण्याचा निर्णय घेतला होता. या तीन्ही संस्थेतील प्रत्येकी तीन अधिकाऱ्यांना पिवळ्या तापाच्या केंद्रासाठी प्रशिक्षण दिले गेले होते.
त्यात या अधिकाऱ्यांना पिवळ्या तापाशी संबंधित माहितीसह लस देण्याची पद्धत, त्याचे प्रमाणपत्र, या व्हॅक्सीन कोणत्या डिग्रीवर सांभाळून ठेवाव्या, लसीकरण घेणाऱ्यांचे रेकॉर्ड कसे ठेवावेत यासह सगळ्या कामाचे प्रशिक्षण दिले गेले होते.
नागपूरच्या मेडिकलमधून डॉ. सुभाष ठाकरे, डॉ. अविनाश गावंडे व डॉ. समीर गोलावार यांना प्रशिक्षण दिले गेले, परंतु त्यानंतर नागपूरचे लसीकरण केंद्र सुरूच झाले नाही. त्यातच डॉ. सुभाष ठाकरे यांची बदली करण्यात आली आहे. तेव्हा केंद्र सुरू होण्यापूर्वीच त्याला बंद केले गेल्याचे बोलले जाते. निश्चितच त्यामुळे आफ्रिकन देशात जाणाऱ्या विदर्भातील नागरिकांना लसीकरणासाठी चांगलाच मन:स्ताप सहन करावा लागत आहे. सध्या नागपूरच्या मेयो रुग्णालयात लसीकरण दिले जात असल्याची माहिती आहे. परंतु येथील लसीकरण दिल्याच्या प्रमाणपत्रावर वैद्यकीय क्षेत्राचे जाणकार संशय व्यक्त करत आहेत. तेव्हा नागपूरला अधिकृत पिवळ्या तापाचे लसीकरण केंद्र सुरू होणार कधी? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पिवळा ताप आढळणारे आफ्रिकन देश
पिवळा ताप आढळणाऱ्या आफ्रिकन देशात अंगोली, बेनिन, बुरूंडी, कॅमरून, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, कांगो, प्रजासत्ताक, आयव्हरी कोस्ट, काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, इक्वेटोरीयल गिनी, इथिओपिया, गॅबॉन, गॉम्बिया, घाना, गिनी, गिनी-बिसाउ, रवांडा, सेनेगल, सिएरा लिऑन, सुदान, युगांडा, केनिया, लायबेरिया, माली, गुनिया, टोगो, छाड, आयव्हरी कोस्ट या देशांसह इतरही काही देशांचा समावेश आहे. अमेरिकाच्याही काही भागात पिवळा ताप आढळून येतो.
नागपूरच्या लसीकरण केंद्राचे फायदे
नागपूरला पिवळ्या तापाचे लसीकरण केंद्र झाल्यास विदर्भातून आफ्रिकन देशात जाण्यास इच्छुक नागरिकांना प्रतिबंधात्मक लसीसह ते घेतल्याच्या प्रमाणपत्राकरिता मुंबई, दिल्लीसह लांबवर जावे लागणार नाही. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा वाचेल. सोबत येथे कमी दरात दर्जेदार लसी त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मिळू शकेल. सध्या महाराष्ट्रात मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळासह आणखी काही केंद्रात हे लसीकरण होते. नागपूरच्या मेयोत लसी दिल्या जात असल्या तरी तेथे लसीचा साठा नसतो. प्रवाशांना बाहेरून लसी आणण्याच्या सूचना केल्या जातात, परंतु या लसी बऱ्याच औषधालयात राहत नसल्याने प्रवाशांना पायपीट करावी लागते.
