अमरावती : योगेश हा फासे पारधी समाजात जन्मलेला मुलगा. गुन्हेगार, व्यसनी म्हणून शिक्का बसलेली त्याची जमात. हा शिक्का त्यावरही लागला होता. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे तो आपल्या वडिलांबरोबर शिकारीला जायचा. शिक्षणाचा त्याला गंध सुद्धा नव्हता. पण, अचानक त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ‘प्रश्नचिन्ह’ या निवासी शाळेतून सुरू झालेला त्याचा प्रवास आता एका सुंदर वळणावर येऊन थांबला आहे.

योगेश ताराबाई मंजू पवार याने नुकतीच राज्य पात्रता परीक्षा (सेट) उत्तीर्ण केली आहे. सामाजिक कार्यकर्ते मतीन भोसले यांच्या ‘प्रश्नचिन्ह’ शाळेत त्याचे शिक्षण झाले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे यांच्यासह अनेक मार्गदर्शकांच्या सहकार्यामुळे योगेशने हे यश मिळवले आहे.योगेश पवार मूळचा शिवरा (ता. नांदगाव खंडेश्वर) येथील आहे. प्राथमिक शिक्षणानंतर त्याला मतीन भोसले यांनी ‘प्रश्नचिन्ह’ शाळेत प्रवेश घेण्याची विनंती केली. मात्र, बालवयात शिकारी आणि व्यसनाधीनतेच्या आहारी गेलेल्या योगेशने रोज दारू आणि खर्रा मिळेल तरच शाळेत येईन, अशी अट घातली होती.

शाळेत आल्यावर मात्र त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. योगाची आवड निर्माण झाल्यावर त्याने राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय योग स्पर्धांमध्ये भाग घेतला. याच काळात त्याला पाठीच्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. अकरावी-बारावीचे शिक्षण त्याने हेमलकसा येथे पूर्ण केले आणि दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षेत त्याने चांगले यश मिळवले.

आमटे कुटुंबीयांचे मोलाचे सहकार्य

योगेशचे भविष्य घडवण्यासाठी मतीन भोसले आणि डॉ. प्रकाश आमटे यांनी त्याला जळगाव येथील ‘दीपस्तंभ’मध्ये स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पाठवले. नूतन मराठा कॉलेजमधून पदवी पूर्ण केल्यानंतर त्याने शिवाजी महाविद्यालय, अमरावती येथून २०२३ मध्ये अर्थशास्त्र विषयात एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण केली. एम.ए.मध्ये सुवर्णपदक मिळवण्याची त्याची इच्छा होती, पण तिसऱ्या पेपरच्या दिवशीच त्याला पुन्हा दुसऱ्या शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले.

या सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत योगेशने ‘सेट’ परीक्षेत यश मिळवले. आता तो कोणत्याही महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून शिकवू शकतो. योगेशने मिळवलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे. आज आमच्या शाळेतील १५० विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत. यासाठी प्रकाश आमटे आणि समाजातील इतर प्रतिष्ठित व्यक्तींचे सहकार्य आम्हाला लाभत आहे. योगेशच्या या यशामुळे फासेपारधी समाजासाठी ‘प्रश्नचिन्ह’ शाळा खऱ्या अर्थाने ‘उत्तर’ बनली आहे, अशा शब्दात ‘प्रश्नचिन्ह’ शाळेचे संचालक मतीन भोसले म्हणाले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.