बुलढाणा:  पैशांच्या कारणावरून शहरातील एका तरुणाला  खुर्चीला बांधून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार  समोर आला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील  या घटनेचा व्हिडीओही समाजमाध्यमांवर प्रसारित झाला आहे.  

पीडित तरुणाने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत.  मलकापूर शहरातील ताजनगर, पारपेठ येथील शेख जाकीर शेख जाबीर (वय ३५ वर्षे ) याला हाशमी नगरमधील भंगार गोदामात बोलावण्यात आले. तक्रारीनुसार, तेथे सैयद अफरोज सैयद हसन कुरेशी (राहणार कुरेशी नगर, मलकापूर) व जावेद शाह शफी शाह (राहणार पांढरी प्लांट मलकापूर) या दोघांनी त्याला खुर्चीला बांधले. त्यानंतर उधार घेतलेले पैसे कधी परत करणार, असा सवाल करीत  शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. तसेच या सर्व घटनेचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात  आले.  

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडित युवकाने हात पाय जोडून सोडून देण्याची  विनंती केली असता, त्याला १५ दिवसांची मुदत देण्यात आली. उसने पैसे या मुदतीत परत न केल्यास  ठार मारण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे, संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आल्यामुळे संबंधित तरुणाची समाजात बदनामी झाली. या तक्रारीच्या आधारे मलकापूर पोलिसांनी आरोपी सैयद अफरोज व जावेद शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक ईश्वर वर्गे करीत आहेत.