वनवे समर्थकांची पक्ष कार्यक्रमात हजेरी
प्रदेश काँग्रेसने नागपुरातील नेत्यांमधील दुफळी गांर्भीयाने घेतल्याने गत दोन वर्षांत शहर काँग्रेस आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार आहेत. शिवाय बदलत्या राजकीय घडामोडीचा वेध घेत विरोधीपक्ष नेते तानाजी वनवे यांना समर्थन देणारे नगरसेवकही आता पक्षाच्या कार्यक्रमांना हजेरी लावू लागले आहेत.
माजी मंत्र्यांचे दोन गट पडले. नेत्यांच्या वर्चस्वाच्या लढाईत शहरातील कार्यकर्ते, पदाधिकारी दोन गटात विभागले आहे. महापालिका निवडणुकीत आणि त्यानंतर विरोधीपक्ष नेतेपदासाठी चक्क प्रदेश काँग्रेसलाच आव्हान दिले. या नेत्यांमधील मतभेद एवढे वाढले की, अनेक कार्यक्रमांना देखील एकमेकांच्या व्यासपीठावर ते दिसत नव्हते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती किंवा पुण्यतिथी, जवाहलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची जयंती आणि पुण्यतिथीला हे नेते एकत्र नव्हते. एवढेच नव्हेतर महात्मा गांधी यांच्या जयंतीचा कार्यक्रम शहर काँग्रेस आणि युवक काँग्रेस स्वतंत्रपणे आयोजित करीत आहेत. शहर काँग्रेस व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ कार्यक्रम घेत आहे तर युवक काँग्रेस सेंट्रल अॅव्हेन्यूवरील गांधी चौकात आयोजित करीत आहे. गेल्या दोन वर्षांपासून हे असेच सुरू आहे.
[jwplayer EhNRhqDW]
नागपूर महापालिकेतील सदस्य संख्या घटली तरी या नेत्यांचे मनोमिलन दूर अजूनही प्रदेश काँग्रेसविरुद्ध मोर्चेबांधणीला जोर आला होता. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांना हटवण्याची मागणी पूर्ण न झाल्याने येथील माजी मंत्र्यांनी दिल्लीत जावून विदर्भ काँग्रेस स्थापन करण्याचा मुद्दा लावून धरला. त्यातूनही फार काही साध्य झाले नाही. दरम्यान, नांदेड महापालिका जिंकल्याने चव्हाण विरोधाची धार बोथट झाली. तानाजी वनवे यांना नागपूर महापालिकेतील विरोधीपक्ष नेते बनवण्यासाठी एकत्र आलेले नगरसेवक हळूहळू प्रदेश काँग्रेस आणि शहर काँग्रेसच्या कार्यक्रमात दिसू लागली आहेत. आता तर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचा कार्यक्रम देवडिया काँग्रेस भवनात शहर काँग्रेस आणि युवक काँग्रेस एकत्रितपणे साजरी करणार आहेत. या कार्यक्रमासंदर्भातील शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि युवक काँग्रेस अध्यक्ष नगरसेवक बंटी शेळके यांचा संदेश हा त्यामुळेच चर्चेचा विषय होता.
राज्य सरकार सर्वच आघाडय़ावर अपयशी ठरले आहे. राज्यातील सर्वच घटक त्रस्त आहे, असा दावा करीत काँग्रेस राज्यात उद्यापासून जनआक्रोश आंदोलन करणार आहे. यासाठी झालेल्या आढावा बैठकांना देखील वनवे यांना साथ देणाऱ्या काही नगरसेवकांनी रवी भवनात हजेरी लावली होती. विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांना शहरातील गटबाजी विचारली असता आता ही गटबाजी शमत आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरोधात दिल्लीत जाऊन तक्रार करणाऱ्या नेत्यांबद्दल विचारले ते म्हणाले, पक्षातील नेते पक्षश्रेष्ठींकडे जाणार नाही तर कुठे जाणार, असा उपरोधिक शब्दांत सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत यांचा नामोल्लेख टाळून टोला लगावला.