अमरावती : एकीकडे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्याचे पालन करून अवैध व्यवसायांविरूद्ध कठोर कारवाई करत असताना दुसरीकडे, महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे एका पब आणि बारला भेट देऊन त्यांच्या अस्तित्वाला मान्यता देत आहेत. हे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे मनोधैर्य वाढवणारे आहे, अशी टीका युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. वर्षातील बावन्न आठवडे आणि ३६५ दिवस आमचे गुन्हेगारी कृत्यांना प्रोत्साहन असेल, असा छुपा संदेश पालकमंत्र्यांना द्यायचा आहे का, असा खोचक सवाल युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
अमरावती शहर गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांच्या विळख्यात सापडले आहे. अमली पदार्थ, जुगार, स्पा सेंटर मध्ये वेश्याव्यवसाय आणि अवैध मद्यविक्री यांसारख्या घातक प्रवृत्तींचा उघडपणे व्यापार सुरू आहे. विशेषतः शहरातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणात पब आणि बारच्या आहारी जात असून, व्यसनाधीनतेचे प्रमाण चिंताजनक स्तरावर पोहोचले आहे.
या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहरातील मान्यवर लोक, विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे युवा नेते रस्त्यावर उतरले. आंदोलने झाली, जनआक्रोश वाढला, आणि त्याच्या दडपणाखाली प्रशासनाने अनेक पब-बारवर कारवाई करून त्यांना बंदही केले. मात्र, अलीकडेच अमरावतीच्या दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्र्यांनी थेट एका पब आणि बारला भेट दिली ही घटना धक्कादायक आहे. ज्यांच्या विरोधात समाजातील सर्व घटक एकत्र येऊन लढा देत आहेत, ज्यांच्या विरुद्ध पोलिसांचे रात्रंदिवस छापेसत्र सुरू आहे, त्या ठिकाणी पालकमंत्री स्वतः हजर होतात, हा प्रकार जनतेच्या मनात गंभीर संशय निर्माण करणारा आहे. हे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासारखे आहे.
पालकमंत्र्यांकडून अशा अवैध व्यवसायांना राजाश्रय दिला जात आहे का?, जर हा राजाश्रय नसेल, तर मग मंत्री अशा ठिकाणी जाण्याची गरज काय होती? आणि जर ही भेट समर्थनाचा संकेत असेल, तर प्रशासनाची कठोर कारवाई ही केवळ दिखावाच आहे का, असा सवाल युवक काँग्रेसने केला आहे. जर पालकमंत्री अवैध व्यवसायांना संरक्षण देत असतील, तर युवक काँग्रेस रस्त्यावर उतरेल आणि ‘उत्तर द्या’ हे आंदोलन पुकारले जाईल. हे आंदोलन केवळ घोषणांपुरते मर्यादित नसेल, तर प्रत्यक्ष कारवाई, जनजागृती आणि आंदोलनाच्या माध्यमातून हा मुद्दा केंद्रस्थानी नेऊ, असा इशारा युवक काँग्रेसचे समीर जवंजाळ, वैभव देशमुख, अनिकेत ढेंगळे, सागर कलाने, योगेश बुंदेले, आशीष यादव, संकेत साहू आदींनी दिला आहे.
