नागपूर : प्राणीसंग्रहालय किंवा एखाद्या राष्ट्रीय उद्यानातील प्राणी बघण्यासाठी लोकांची मोठी गर्दी असते. या ठिकाणांवर अनेकदा लोक दगड मारतात किंवा ओरडतात. लोकांच्या या वागण्यामुळे प्राण्यांना नक्कीच त्रास होतो. अशात काही दुर्घटना घडली तर सगळ्यांना धक्का बसतो. अशीच एक घटना उपराजधानीतील ब्रिटिशकालीन प्राणीसंग्रहालयात गुरुवारी सकाळी घडली. कृषी महाविद्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या महाराजबाग प्राणीसंग्रहालयात एक माणूस शिरला आणि मग प्राणीसंग्रहालय प्रशासनात धावाधाव सुरू झाली.

दीडशेवर्षाहून अधिक जुने ब्रिटिशकालीन महाराजबाग प्राणिसंग्रहालय नागपूर शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. या प्राणिसंग्रहालयाची धुरा डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांच्या अंतर्गत नागपुरातील कृषी महाविद्यालयाच्या अखत्यारीत आहे. दररोज शेकडो पर्यटक याठिकाणी येत असतात. दरम्यानच्या काळात “मॉर्निंग वॉक” साठी महाराजबागेत नागरिक यायचे आणि परिसरात असलेल्या प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना खाद्यवस्तू द्यायचे. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात गेले आणि “मॉर्निंग वॉक” साठी येणाऱ्या नागरिकांना याठिकाणी बंदी घालण्यात आली. गुरुवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास एक व्यक्ती प्राणिसंग्रहालय परिसरात शिरला.

 चौकीदाराच्या लक्षात येताच त्याला बाहेर काढले. दरम्यान, साडेसात वाजताच्या सुमारास प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या पिंजऱ्यातील सफाई कर्मचारी वाघाच्या पिंजऱ्याची सफाई करण्यास गेले असता त्यांना हा व्यक्ती वाघाच्या पिंजऱ्यात आढळला. कर्मचाऱ्यांनी तातडीने प्राणिसंग्रहालय प्रशासन, वनविभाग तसेच सीताबर्डी पोलीस ठाण्यात सूचना दिली. तातडीने वनविभाग व पोलीस विभागाची चमू याठिकाणी दाखल झाली.  या व्यक्तीने पिंजऱ्याच्या पहिल्या भागात प्रवेश केला होता. त्यावेळी वाघ पिंजऱ्याच्या दुसऱ्या भागात म्हणजेच “नाईट शेलटर” मध्ये होते. त्यामुळे अनर्थ टळला. ही बाब उशिरा लक्षात आली असती तर कदाचित त्या व्यक्तीने “नाईट शेलटर” मध्ये प्रवेश केला असता तर मोठा अनर्थ घडला असता. दरम्यान, या व्यक्तीला सीताबर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

 या प्रकारामुळे प्राणिसंग्रहालयात खळबळ निर्माण झाली होती. या घटनेबद्दल प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता, पिंजऱ्यात घुसण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती वेडसर असावा, असे सांगण्यात आले. या प्रकारामुळे प्राणिसंग्रहालयात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. प्राणिसंग्रहालयात कर्मचारी कमी असल्यामुळे छोट्या प्राण्यांच्या पिंजऱ्यांच्या देखभालीसाठी पूर्णवेळ कर्मचारी नाहीत. त्यामुळे प्राण्यांचीही हेळसांड होत आहे.