वाचनाने माणूस समृद्ध होतो याची अनुभूती विद्यार्थ्यांना शालेय जीवनात मिळावी यासाठी राज्य शासनाने वाचन प्रेरणा दिनाद्वारे पुढाकार घेतला आहे. १५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनात जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या खासगी तसेच सरकारी शाळांमधील १२ लाखहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या उपक्रमातून १० लाखांहून अधिक पुस्तके वाचली जाणार असल्याने विद्यार्थ्यांचे र्सवकष वाचन व्हावे, यासाठी शिक्षण विभागाने सार्वजनिक वाचनालय, वाचनप्रेमींना साकडे घालत त्यांच्याकडून मुबलक प्रमाणात ग्रंथसंपदा उपलब्ध करून दिली आहे.

भारताचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन शासनाने ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. यंदा या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष. बदलत्या जीवनशैलीत वाचन संस्कृतीचा ऱ्हास होत आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी शिक्षण विभाग सक्रिय झाला आहे. जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद, महापालिका यांच्या सहकार्याने जिल्ह्यातील पाच हजार ५०० शाळांतील इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू यांसह अन्य माध्यमांतील १२ लाख ६५ हजार विद्यार्थ्यांसाठी या दिनाचे औचित्य साधत वाचन कट्टा, साहित्यिकांशी संवाद, वाचू आनंदे यासह अन्य महत्त्वपूर्ण उपक्रमांच्या आयोजनासह या दिवशी ‘दप्तरमुक्त शाळा’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.  जिल्हा परिषद शाळेतील ग्रंथालय त्या दिवसासाठी विद्यार्थ्यांना खुले करून देणार आहे. नजीकच्या वाचनालयातून गोष्टी, स्पर्धा परीक्षाची पुस्तके, काव्यसंग्रह, कथा, कादंबऱ्या मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय परिसरातील वाचनप्रेमींकडूनही त्या दिवसासाठी पुस्तके विद्यार्थ्यांना द्यावी, असे आवाहन करण्यात आल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन अहिरे यांनी सांगितले.

विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये अवांतर वाचनाची गोडी राहावी यासाठी वाचन कट्टासारखे उपक्रम सातत्याने सुरू राहावेत यासाठी नियमित आढावा घेतला जाईल. नाशिक महापालिका शिक्षण विभागाकडून वाचन प्रेरणा दिनाच्या आधीच उपक्रमाचा आरंभ झाला. गुरुवारी दुपारी महापौरांच्या हस्ते या उपक्रमाचे औपचारिक उद्घाटन झाले. या वेळी महापालिकेच्या २८ शाळांना पुस्तके वितरित करण्यात आली. या उपक्रमात प्राथमिक व माध्यमिक सर्व माध्यमांतील ३५ हजार विद्यार्थी सहभागी होणार असल्याचे शिक्षणाधिकारी नितीन उपासनी यांनी सांगितले. परिसरातील साहित्यिक, कवी यांच्याशी चर्चा सुरू असून त्या दिवशी ते विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. शालेय स्तरावर महापालिकेच्या २८ शाळांमध्ये वाचन कट्टा आहे. विद्यार्थी ‘वाचू आनंदे’ या उक्तीने उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. शनिवारी दप्तरमुक्त शाळेचा आनंदही विद्यार्थी घेतील असे उपासनी यांनी सांगितले.