News Flash

उत्तर महाराष्ट्रात भाजपबरोबरच सेनेची मुसंडी

प्रस्थापितांविरोधातील मतदानाचा लाभ नंदुरबार जिल्ह्य़ातील शहादा पालिकेत भाजपला झाला.

लोकसभा आणि विधानसभेप्रमाणेच उत्तर महाराष्ट्राचा गड भाजपने कायम राखला असला तरी स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणाऱ्या शिवसेनेने या भागात मुसंडी मारली आहे. या तुलनेत आधीचे प्रस्थापित काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मात्र मोठा फटका बसला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील चारही जिल्ह्य़ांतील पालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीला बसलेला हादरा हे एक समान सूत्र राहिले आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीत नाशिक जिल्ह्य़ात नेतृत्वहीन झालेल्या या पक्षाचे अपयश ठळकपणे समोर आले. निवडणूक झालेल्या सहा पालिकांपैकी एकाही पालिकेत राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष नसणे हे त्या पक्षाची दिवसेंदिवस होत चाललेली अधोगतीच दर्शवीत आहे. जिल्ह्य़ात विधानसभा निवडणुकीपासून अंतर्गत वादात अडकलेल्या काँग्रेसला दूर सारताना मतदारांनी शिवसेनेच्या यशात तब्बल तिपटीने वाढ केली.

भगूरमधील १५ वर्षांपासूनची सत्ता पुन्हा एकदा शिवसेनेच्या ताब्यात देताना मतदारांनी एकत्र आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीस सपशेल धूळ चारली. विशेष म्हणजे येथील जाहीर सभेत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेनेच्या मुखपत्रात आलेल्या मराठा मोर्चासंदर्भातील व्यंगचित्राचा वादही उकरून काढला होता. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षासह भाजपच्या डझनाहून अधिक राज्यस्तरीय नेत्यांनी जाहीर प्रचार सभा घेऊनही मतदारांनी त्यांच्यापेक्षा शिवसेनेवर अधिक विश्वास टाकला. नोटाबंदी आणि कृषिमालाला मिळणारा अल्प भाव याचाही परिणाम भाजपला सहन करावा लागला.

नाशिकप्रमाणेच जळगाव जिल्ह्य़ातही काँग्रेस, राष्ट्रवादीला पक्षांतर्गत वाद आणि कणखर नेतृत्वाअभावी सपाटून मार खावा लागला.  माजी मंत्री एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील शीतयुद्धाची पाश्र्वभूमी असतानाही जळगाव जिल्ह्य़ात सहा पालिकांमध्ये विजय मिळविणाऱ्या भाजपच्या यशाचे मुख्य कारण त्यांना शिवसेनेशिवाय प्रबळ विरोधकच नसणे हे ठरले. तीन पालिका ताब्यात आल्याने शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या एकखांबी नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले. सुरेश जैन हे या निवडणुकीत फारसे सक्रिय नव्हते. विधान परिषद निवडणुकीतील यशानंतर लगोलग पालिका निवडणुकीतही  यश मिळाल्याने गिरीश महाजन यांचे जिल्ह्य़ातील वर्चस्व वाढणार आहे.

धुळे जिल्ह्य़ातील शिरपूरमध्ये अपेक्षेप्रमाणे मतदारांनी काँग्रेसचे आमदार अमरीशभाई पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकला. दोंडाईचात भाजपचे रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्याविरुद्ध ऐन निवडणुकीत घरकुल प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा उकरून काढला. या प्रकरणी झालेल्या आरोपांची उत्तरे देण्यातच डॉ. देशमुख यांचा वेळ गेला. त्यातच राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचाही परिणाम त्यांच्या मतदानावर झाला. प्रस्थापितांविरोधातील मतदानाचा लाभ नंदुरबार जिल्ह्य़ातील शहादा पालिकेत भाजपला झाला. या ठिकाणी सत्ताधारी काँग्रेसच्या दीपक पाटील गटाला त्यांची निष्क्रियता भोवल्याचे मानले जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 1:06 am

Web Title: bjp shiv sena leading in north maharashtra
Next Stories
1 ‘लोकसत्ता लोकांकिका’चा नाशिकमध्ये उत्साह
2 अमळनेर, सिन्नरचा अपवाद वगळता  उत्तर महाराष्ट्रात शांततेत मतदान 
3 नियम न पाळल्यामुळेच नाशकात अपघाताच्या प्रमाणात वाढ
Just Now!
X