राधाकृष्ण विखे यांचा आरोप

गोरखपूर येथे प्राणवायूअभावी बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेपासून महाराष्ट्र सरकारने कोणताही बोध घेतला नाही. सरकारच्या निष्काळजीपणामुळे नाशिकमध्ये नवजात बालकांचा मृत्यू झाला असून  असा आरोप करत त्याची नैतीक जबाबदारी आरोग्यमंत्र्यांनी घ्यायला हवी, अशी स्पष्ट प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

पाच महिन्यात जिल्हा शासकीय रुग्णालयात २२७ बालकांचा मृत्यू झाल्याच्या पाश्र्वभूमीवर, विखे पाटील यांनी शुक्रवारी नवजात बालक उपचार कक्षाची पाहणी केली. बालमृत्यू हे सरकारचे संयुक्त अपयश आहे. भाजप सरकार राजीनामा मागण्याच्या पलिकडे गेले आहे. त्यामुळे आपण राजीनामा मागणार नाही. मुख्यमंत्र्यांनी मेट्रो आणि समृध्दी महामार्गातून बाहेर पडून मूलभूत गरजांकडे लक्ष द्यावे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

मागील तीन वर्षांत जिल्हा रुग्णालयात झालेल्या नवजात बालकांच्या मृत्यूची आकडेवारी पाहिल्यास त्याची तीव्रता लक्षात येते. ही घटना समोर आल्यावर आरोग्यमंत्र्यांनी धाव घेत इनक्युबेटर व इतर व्यवस्था करण्याचे जाहीर केले. इनक्युबेटरची किंमत फार नसते. ही व्यवस्था आधीच होणे अपेक्षित होते. स्थलांतर व कुपोषण यामुळे हे मृत्यू झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. आदिवासींना स्थानिक पातळीवर रोजगार आणि त्यांची भूक भागविण्याचे सरकारचे कर्तव्य नाही काय, असा प्रश्न त्यांनी केला.

गर्भवती महिला व कुपोषित बालकांना पोषक आहार व उपचार देण्यासाठी अस्तित्वातील ‘व्हीसीडीसी’ केंद्र शासनाने बंद केली. आता बंद पाकिटातून आहार दिला जाणार असल्याचे सांगितले जाते. परंतु, ही पाकिटे आधी मंत्रालयात जातील आणि काही शिल्लक राहिले तर आदिवासीपर्यंत पोहोचतील असे नमूद केले. जननी सुरक्षा योजनेची सद्यस्थिती शासनाने जाहीर करावी.

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने योजना सुरू केली. परंतु, त्याचा काही उपयोग झाला नाही. इतक्या गंभीर घटना राज्यात घडत असताना मुख्यमंत्री, मुख्य सचिवांनी किती कुपोषित भागांना भेटी दिल्या हे जाहीर करावे. ग्रामीण रुग्णालयांची बिकट स्थिती आहे.  सर्पदंशावरील औषधे उपलब्ध नसल्याने अनेकांना प्राण गमवावे लागतात. मुख्यमंत्री भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी घालतात. क्लिन चिट देतात. यामुळे मंत्री व अधिकारी बेफिकीर झाल्याचा आरोपही विखे यांनी केला.

सरकार काही करत नसल्याने कुपोषित बालकांच्या संगोपनासाठी प्रवरा ट्रस्ट जव्हार भागात केंद्र सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महापालिकेवर शरसंधान

नाशिक महापालिकेची रुग्णालये निव्वळ रुग्ण संदर्भित करणारी रुग्णालये झाल्याचे टिकास्त्र विखे पाटील यांनी सोडले. पालिकेच्या रुग्णालयात इनक्युबेटर नाहीत. तेथील रुग्णांना जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. त्याचा ताण या रुग्णालयावर आला. आपल्या रुग्णालयात आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करण्यास महापालिकेला अपयश आल्याचे त्यांनी सांगितले.