News Flash

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रक्त तुटवडा

करोनाच्या दुसऱ्या लाटेत विभागात सध्या दररोज आठ हजाराच्या आसपास नवीन रुग्ण आढळत आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

विभागात केवळ ४५० पिशव्या शिल्लक

नाशिक : करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना विभागात सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा भासत आहे. नियमितपणे होणारी रक्तदान शिबिरे थंडावली. व्यक्तिगत पातळीवर रक्तदानासाठी फारसे कुणी पुढे येत नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. विभागात शासकीय रक्तपेढीत १३१ तर, खासगी रक्तपेढीत ३१९ पिशव्या रक्त शिल्लक आहे. बी (निगेटिव्ह) रक्तगटाची एकही पिशवी शिल्लक नाही. एबी (निगेटिव्ह) आणि ओ (निगेटिव्ह) या रक्तगटाच्या हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच पिशव्या शिल्लक आहेत.

करोनाच्या दुसऱ्या लाटेत विभागात सध्या दररोज आठ हजाराच्या आसपास नवीन रुग्ण आढळत आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या ६० हजाराचा टप्पा ओलांडण्याच्या मार्गावर आहे. विभागात दोन हजार रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. करोना बाधितांसह अन्य व्याधीचे तसेच शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना रक्ताची निकड भासत आहे. दुसरीकडे रक्तांची गरज पूर्ण होईल तितके संकलन होत नाही. वैयक्तिक पातळीवर दाते पुढे येत नसल्याने रक्त मिळविण्यासाठी नातेवाईकांना धावपळ करावी लागत आहे. संबंधित गटाची व्यक्ती शोधून कशीबशी तात्पुरती निकड भागविली जाते. विभागात सर्वच जिल्ह्यात ही स्थिती आहे.

आरोग्य सेवा नाशिक मंडळ विभागाच्या अहवालानुसार नाशिक जिल्ह्यात शासकीय रक्तपेढीत ९३ आणि खासगीत ७८ पिशव्या, जळगावमध्ये शासकीय १५ तर खासगी रक्तपेढीत १६६, धुळे जिल्ह्यात शासकीय १६ आणि खासगीत शून्य, नंदुरबार जिल्ह्यात शासकीय रक्तपेढीत एकही पिशवी नसून खासगी रक्तपेढीत २१ पिशव्या शिल्लक आहेत. अहमदनगर जिल्ह्यात शासकीय रक्तपेढीत सात तर खासगी रक्तपेढय़ांमध्ये ५४ पिशव्या आहेत.

 

रक्तगटनिहाय स्थिती

विभागात एबी (पॉझिटिव्ह) रक्तगटाच्या शासकीय रक्तपेढीत २८ तर खासगी रक्तपेढय़ांमध्ये ८५ पिशव्या आहेत. एबी (निगेटिव्ह) रक्तगटाच्या शासकीय रक्तपेढीत केवळ एक तर खासगीत दोन पिशव्या आहेत. ए (पॉझिटिव्ह) रक्तगटाच्या शासकीयमध्ये ३४, खासगी पेढीत ८६, ए  (निगेटिव्ह) रक्तगटाच्या शासकीय पेढीत पाच, खासगीमध्ये चार, बी (पॉझिटिव्ह) रक्तगटाच्या शासकीय पेढीत नऊ, खासगी रक्तपेढीत २५, बी (निगेटिव्ह) रक्तगटाची संपूर्ण विभागात एकही पिशवी शिल्लक नाही. ओ (पॉझिटिव्ह) रक्तगटाच्या शासकीय पेढीत ५२, खासगी रक्तपेढीत १०७, ओ (निगेटिव्ह) गटात शासकीय रक्तपेढीत दोन, खासगी रक्तपेढीत १० पिशव्या शिल्लक असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

नाशिकसह अनेक भागात रक्ताचा प्रचंड तुटवडा भासत आहे. करोनामुळे रक्त संकलनात कमालीची घट झाली आहे. रक्तदानासाठी कुणी पुढे येत नाही. रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी सोसायटी, संस्था, आस्थापना आदी लहान गटांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची नितांत गरज आहे. -डॉ. नंदकिशोर तातेड (अध्यक्ष, अर्पण रक्तपेढी, नाशिक)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 12:05 am

Web Title: corona virus infection blood scarcity akp 94
टॅग : Coronavirus
Next Stories
1 राज्यभर गरवी कांदा मुबलक
2 सव्वातीन लाखांहून अधिक लसकुप्या
3 नांदुरमध्यमेश्वरात १० हजारपेक्षा अधिक पक्ष्यांची नोंद
Just Now!
X